सयाजीराव गायकवाड यांचे देशप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:57 IST2018-03-17T18:50:05+5:302018-03-17T18:57:21+5:30
प्रासंगिक : ११ मार्च हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. सद्य:स्थितीत सर्वच राष्ट्रांत जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक भेद पाहावयास मिळतात. जो तो आपला सवतासुभा उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात राष्ट्राचा किंवा त्यांच्या एक संघपणाचा विचार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर सयाजीराव महाराजांनी हिंदुस्थान एकसंघ विकसित राष्ट्र म्हणून पुढे यावे यासाठी प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्न आजही अनुकरणीय, महनीय आहेत. त्यांच्या जन्मदिनी या प्रयत्नांना उजाळा मिळणे आवश्यक आहे.

सयाजीराव गायकवाड यांचे देशप्रेम
- डॉ. राजेंद्र मगर
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतात अनेक संस्थाने अस्तित्वात होती. त्यातील अनेक संस्थानिक प्रजेच्या हिताकडे लक्ष देत नव्हते. मोजकेच संस्थानिक प्रजादक्ष होते. यात बडोद्याचे संस्थानिक महाराज सयाजीराव गायकवाड होते. त्यांनी वेळोवेळी संस्थानाबरोबर राष्ट्रहिताचा विचार मांडला. संस्थानच्या उन्नतीपेक्षा देशाची उन्नती होणे गरजेचे आहे, हा विचार ते नेहमी मांडत. त्यादृष्टीने कार्यवाही करीत होते. त्यांनी संस्थानात राज्यकारभार, राजकीय औद्योगिक, ग्रामपंचायती, न्यायव्यवस्था, ग्रंथालये, महिला सक्षमीकरण, आरोग्यसंरक्षण, जलसिंचन, अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या. त्या सुधारणा ‘न भूतो न भविष्यती’ अशा होत्या. संस्थान सोडून इतर संस्थानांत सुधारणांच्या बाबतीत ते हस्तक्षेप करू शकत नव्हते; परंतु भारतातील सुधारणांबाबत ते नेहमी आपले मत व्यक्त करीत, तसेच संस्थानाच्या बाहेर शक्य तितकी मदत करीत. त्यांनी आपण आणि आपले राज्य हा संकुचित विचार केला नाही. भारतात अनेक कारणांमुळे विविधता आहे आणि त्या विविधतेत एकता आहे. एकसंघ देशासाठीही प्रयत्न केले.समाजव्यवस्था सुधारल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही हे महाराज जाणून होते. तसा विचार त्यांनी लाहोर येथील दयानंद आयुर्वेदिक कॉलेजच्या मानपत्राला उत्तर देताना इ.स. १९०३ साली व्यक्त केला.
महाराजांनी देशाच्या विकासाविषयी बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर दिला. त्यांनी सर्वच प्रांतांतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे. शिष्यवृत्ती देऊन उच्चशिक्षणासाठी इंग्लंड, अमेरिका, जपान, स्वीत्झर्लंड देशांत पाठविले. यात सर्व क्षेत्राचा विचार केला. यामध्ये शेतीसाठी खासेराव जाधव, रावजीभाई पटेल यांना रेशमाच्या उत्पन्नाचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरला पाठवले, तर सूपशास्त्रासाठी नामदेवराव रामचंद्रराव कदम, संगीतासाठी संगीत कॉलेजचे प्राचार्य मौलाबक्ष यांचा मुलगा अल्लाउद्दीन यांना, ग्रंथालयासाठी रा. कुडाळकर, धर्मशिक्षणासाठी विठ्ठल रामजी शिंदे, कायदा आणि उच्चशिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाश्चात्त्य देशात पाठविले, अशी नमुन्यादाखल काही उदाहरणे सांगता येतील. विद्यार्थ्यांना ज्या विषयात आवड आहे त्या विषयासाठी शिष्यवृत्ती दिली. त्यामध्ये विद्यार्थी संस्थानातीलच पाहिजे, असा विचार केला नाही. देशातील सर्वच प्रांतांतील अभ्यासू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले. या पाठीमागे महाराजांचे देशप्रेम होते.
सयाजीराव महाराजांचे दातृत्व फार मोठे होते. त्यांनी अनेक गरजवंतांना मदत केली. यासाठी संस्थानातील व्यक्ती किंवा संस्था अशी संकुचित वृत्ती ठेवली नाही. हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतात त्यांनी मदत केली. त्यातील नमुन्यादाखल उदाहरणे- महाराजांनी ललितकला प्रदर्शन मद्रास, अनाथाश्रम बंगळुरू, लिटररी सोसायटी कोलकाता, इंडियन कॉलेज अलीगड, देवसमाज लाहोर, धर्म परिषद बंगळुरू, हिंदू विद्यापीठास बनारस, इंडियन क्लब म्हैसूर, ब्राह्मण समाज हैदराबाद, राजकोट इस्पितळ उभारण्यासाठी बद्रीनाथ केदारनाथ रस्त्यावर सदावर्ते घालण्यासाठी, अखिल भारतीय संगीत परिषद लखनौ, ओरिएंटल परिषद कोलकाता ही काही उदाहरणे सांगता येतील. वरील नमुन्यादाखल उदाहरणांत महाराष्ट्रातील सर्वच प्रांतांत मदत केल्याचे दिसते. यातून महाराजांची देशाविषयी असणारी आपुलकी लक्षात येते. फक्त हिंदुस्थानातच नाही, तर त्यांनी देशाबाहेरही मदत केली. महाराजांचे दातृत्व अफाट होते. त्यांनी महात्मा गांधी, योगी अरविंद, दादाभाई नौरोजी, पंडित मदन मोहन मालवीय, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अनेक कलाकार, प्रकाशक, लेखक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यासह अनेक क्रांतिकारक केशवराव देशपांडे, खासेराव जाधव, अरविंद घोष, समकालीन संस्थानिक आणि महाराष्ट्रातील तसेच अखिल हिंदुस्थानातील अनेक कर्त्यापुरुषांना मदत केली.
देश एकसंघ ठेवायचा असेल, तर संपूर्ण देशाची एकच भाषा असावी, असे त्यांचे मत होते. २४ मार्च १९३४ साली दिल्ली येथील अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावर बोलताना त्यांनी हिंदी भाषा राष्ट्रभाषा होण्यासाठी समर्थन केले. देशात असणारे दोष सांगत असताना त्यांना आपल्या देशातील बलस्थानेही माहीत होती. महाराजांच्या अशा अनेक कृतींमुळे त्यांची गणना राष्ट्रनिर्मात्या पुरुषांत होणे स्वाभाविक आहे. संस्थानिक देशाच्या स्वातंत्र्याबाबत जास्त उत्सुक नसत. मात्र, महाराजांनी याबाबतीतही आघाडी घेतली होती. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना मदत केल्याचे अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले आहे. महाराजांचे अभ्यासक, चरित्रकार बाबा भांड यांनी अलीकडे ब्रिटिश ग्रंथालयातून ‘बँडेड बॉक्स केस’ ही फाईल आणली आणि त्यामधून महाराजांनी क्रांतिकारकांना मदत केल्याचे उघड झाले. या नव्या इतिहासातून त्यांचे देशप्रेम स्वातंत्र्याबाबतची आग्रही भूमिका प्रकर्षाने दिसते. त्यांचे विचार पुनरुज्जीवित करणे, विचारांचे पुन:पुन्हा मंथन करणे हीच महाराजांना योग्य आदरांजली ठरेल.