‘ध्यास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:14 IST2018-07-21T16:13:44+5:302018-07-21T16:14:31+5:30
लघुकथा : तुकाराम शिकल्या-सवरल्यांचा सल्ला घेऊ लागला. त्याला पुढून येताना विजय दिसला. विजय नुकतीच कृषी विद्यापीठाची पदवी घेऊन गावी आला होता. विजय जवळ आल्या-आल्या तुकाराम म्हणाला, ‘बस झालं की शिक्षण, कई खाऊ घालता लाडू.’ हातातील कागदाची घडी करीत विजय म्हणाला, ‘‘एम.पी.एस.सी. पास झाल्याशिवाय नाही.’’

‘ध्यास’
- महेश मोरे
पाऊस पडला होता. मिरगात अबक लावण झाली होती. पेरण्या आटोपल्या होत्या. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली होती. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला निघाल्या होत्या. शेतीच्या कामात अडकून पडलेला तुकाराम घोगरेला फुरसतच मिळत नव्हती. त्याच्या ओठी विठ्ठल-विठ्ठल नाव खेळत होतं. तो सारखा विठ्ठल नावाचा जप करतो. वडिलोपार्जित शेती असल्यानं तो शेतीच्या कामात गुरफटून गेला होता. चिखलात पाय फसत जावा तसा तो आतल्या आत जात होता. कधी कोरडा दुष्काळ. त्यातच त्याच्या देहाची चिवटी झाली होती. गावची दिंडी पंढरपूरला गेली. आपणाला जाता आलं नाही. कुणब्याच्या मागं लई लचांड. नंदकिशोर शिकू लागला. त्याला पैसा लागू लागला. नंदकिशोरला शिक्षणाची आवड होती. त्यानं शिक्षणाची कास धरली. पनिक तुकारामची ओढातान व्हऊ लागली. काळ्या आईची सेवा हीच त्याची वारी होती. तो गाई-म्हैसीला जीव लावू लागला. त्यानं एका लाडक्या काळ्या गाईचं नाव रुक्मिण ठेवलं होतं. राबणारा त्याचा काळा देह जणू विठ्ठलानंच आपणाला हे रूप दिलं असं त्याला वाटायचं. त्याच्या कष्टानं रान फुललं होतं. शेतात पिकाची दाटी पाहून त्याला सगळी पिकं पंढरीचे वारकरीच असा भास होत होता.
तुकाराम शिकल्या-सवरल्यांचा सल्ला घेऊ लागला. त्याला पुढून येताना विजय दिसला. विजय नुकतीच कृषी विद्यापीठाची पदवी घेऊन गावी आला होता. विजय जवळ आल्या-आल्या तुकाराम म्हणाला, ‘बस झालं की शिक्षण, कई खाऊ घालता लाडू.’ हातातील कागदाची घडी करीत विजय म्हणाला, ‘‘एम.पी.एस.सी. पास झाल्याशिवाय नाही.’’
‘‘काय असते ती एम.सी.सी.’’
‘‘अहो! एम.पी.एस.सी. म्हणजे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा. ती परीक्षा पास झाल्यावर तहसीलदार होता येतं.’’
‘‘आरं वा! तहसीलदाराची नवकरी मह्या पोराला शिकवतो त्याला कोठं ठिवावं. मही आमना हाये त्यानं लई मोठा सायब व्हवावं.’’
‘‘आता तो काय करतो.’’
‘‘त्यानं व्हय बी.ए. झाला. आता एम.ए. शिकायला.’’
‘‘मग ठिवा त्याला पुण्याला. तो करील तयारी परीक्षेची.’’
‘‘अहो! त्या कलंबरच्या सोयऱ्याचा पोरगा गावात राहून चिपसायब झाला.’’
‘‘तुमचंं खरं हाये... आता काळ बदलला. शहरात मोठ्या-मोठ्या अभ्यासिका असतात. त्याठिकाणी पाहिजे ती पुस्तकं मिळतात.’’
‘‘असं व्हय, बरं किती खर्च येईल.’’
‘‘आधी तुमचं उत्पन्न वाढवा, एखादा जोडधंदा करा’’
‘‘कोणता जोडधंदा करावा.’’
‘‘अहो! आपल्या गावापासून शहर जवळ आहे. करा की दुधाचा व्यवसाय. घ्या चार म्हशी.’’
‘‘बाब्या, आधीच दोन म्हशी हायेत. दोन दुधाच्या घेतो विकत.’’
विजय बोलून उभ्या-उभ्या निघून गेला. तुकाराम दूध व्यवसायाकडं वळला. त्याचा जोडधंदा जोरात चालला होता. त्याच्या कष्टातून पैसा जवळ जमा होऊ लागला. नंदकिशोरही स्पर्धा परीक्षेकडं वळता होता. तो तौर सरांचा सल्ला घेऊ लागला. त्याला खाडे सरांचंही मार्गदर्शन मिळत होतं. तुकारामच्या डोक्यात सारखं चक्र फिरू लागलं. पोराला शिकवायचं. त्याच्या मनी एकच ध्यास होता. पोराला सायब बनवायचं.
( maheshmore1969@gmail.com )