कल्पकतेतून उभारलेला जायकवाडी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:29 IST2018-09-15T18:28:19+5:302018-09-15T18:29:00+5:30
जायकवाडी प्रकल्प मराठवाड्याची जीवनरेखा ठरला असून यामुळे ५ जिल्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे

कल्पकतेतून उभारलेला जायकवाडी प्रकल्प
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी (नाथसागर) धरण स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकीचा आविष्कारच म्हणावा लागेल. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागावर फुंकर घालण्याचे काम या प्रकल्पामुळे झाले असून, पाच जिल्ह्यांना या प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
गोदावरी नदीवर असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन १९६५ मध्ये झाले होते, तर लोकार्पण २४ फेबु्रवारी १९७६ साली माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. मातीमध्ये बांधलेल्या धरणाचे २७ दरवाजे काँक्रिटीकरणातून निर्माण करण्यात आलेले आहेत. २१ व्या शतकाच्या तुलनेत त्यावेळी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये संशोधन आणि विकासाला फारशी चालना मिळालेली नव्हती. असे असताना तत्कालीन अभियंत्यांनी पूर्ण कल्पकतेने त्या प्रकल्पाची निर्मिती करून मराठवाड्याची दुष्काळातून मुक्तता केली. पुढे याच प्रकल्पावर शासनाने १९८४ मध्ये पाण्यावर चालणारा वीज प्रकल्प उभारला.
४२ वर्षांपासून मराठवाड्याची भाग्यरेखा असलेल्या या प्रकल्प निर्मितीचे काम ११ वर्षे चालले. २९०९ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे २ लाख ७६ हजार हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली.
२१ हजार ७५० चौ.कि़ मीटर इतके प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र आहे. १९७६ ते २०१८ या ४२ वर्षांत हे धरण १८ वेळा भरले. २००६ मध्ये धरणातून अडीच लाख क्युसेकने पाणी धरणातून सोडले होते, हा ४२ वर्षांतील उच्चांक होता.