International Yoga Day 2018 : योगावर संशोधन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:41 IST2018-06-21T18:40:58+5:302018-06-21T18:41:36+5:30
योगशास्त्र : योगाचा केवळ वरवर अभ्यास केला जात आहे. जो समाजाच्या विकासात हिताचा नाही. योगासनाचा सखोल अभ्यास शास्त्रीय बैठक पाहिजे.

International Yoga Day 2018 : योगावर संशोधन व्हावे
- राजेश भिसे
योगशास्त्रावर पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. तुलनेने भारतात संशोधन होताना दिसून येत नाही. योगशास्त्रात संशोधन होण्यासह मुलांनी योगा शिकावा यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योगा खऱ्या अर्थाने पोहोचू शकेल, असे मत योग संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. जयंत बरिदे यांनी व्यक्त केले.
जागतिक योग दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. बरिदे यांनी योगासन आणि मानवी शरीर यांच्या संबंधांवर परखडपणे आपली मते मांडली. स्वानुभव कथन करताना डॉ. बरिदे म्हणाले की, वयाच्या चाळिशीत असताना हृदयरोगाचा त्रास सुरू झाला. बायपास सर्जरीशिवाय पर्याय नव्हता; पण त्याकाळी या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण ५० टक्के होते. तेव्हा मेव्हणे डॉ. मुळे यांनी योगासन करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून योगाकडे वळलो. योगासनांमुळे प्रकृतीत फरक पडला. म्हणून योगासनाच्या अभ्यास आणि संशोधनासाठी स्वत:ला वाहून घेतले.
योगा म्हणजे ‘मुळे कुठार’ अर्थात मुळावर घाव घालणे. योगासनातील विविध आसनांमुळे शरीरातील विविध व्याधी वा आजारांवर मुळापासून घाव घातला जातो. शरीरातील आजार मुळासकट नष्ट केला जातो. म्हणूनच योगासनांना मानवी आयुष्यात निरोगी जीवनासाठी महत्त्व आहे. तुमचे जगणे म्हणजे योग आहे; पण आजकाल स्वअध्ययन संपले आहे. योगाचा केवळ वरवर अभ्यास केला जात आहे. जो समाजाच्या विकासात हिताचा नाही. योगासनाचा सखोल अभ्यास शास्त्रीय बैठक पाहिजे. योगा म्हणजे जाणीवपूर्वक एखादी कृती करणे. योगा म्हणजे वैयक्तिक जीवन जगत असताना काय बंधने बाळगली पाहिजे, समाजात कसे वागले पाहिजे.
मन शांत राहिले तर आरोग्य चांगले राहते. योगासनातील ध्यान, धारणा आणि प्राणायम यामुळे मनावर नियंत्रण राखून वाईट विचारांपासून परावृत्त करता येऊ शकते. तसेच प्राणायमाच्या माध्यमातून मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. साक्षी भाव ठेवून जीवन जगता आले पाहिजे. साक्षी भाव अर्थात अलिप्त राहून विचार करणे आणि याचा स्वत:वर परिणाम न होऊ देणे. आपण गत २५ वर्षांपासून योगासन शिकवत आहोत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत योगासन करण्यासाठी आपल्याकडे येतात. कोणत्याही उपचारांवर शंभर टक्के विसंबून राहू शकत नाही. प्रत्येक शास्त्राचेत्या त्या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणूनच वाद अपेक्षित नाही.
मुलांनी योगासन करावे
लहानपणापासून मुलांनी योगासन केले, तर तरुणपणात त्यांना निरोगी शरीर लाभते. यासाठी पालकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. मुलांनी नियमित वा आठवड्यात अर्धा तास योगासन करावे. जेणेकरून मन आणि शरीर सुदृढ राहण्यास मदत होऊ शकेल.
जनजागृतीसाठी मोहीम
योगशिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शहरातील अकरा संघटनांनी योग संवर्धन समिती स्थापन केली आहे. जागतिक योग दिनानिमित्त या समितीच्या माध्यमातून शहरातील विविध शासकीय कार्यालये, औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, रुग्णालये, उद्याने येथे योगासनांबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जात आहे.