‘एक वही-एक पेन...’ कृतिशील तरुणांचे डोळस अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:51 AM2018-04-13T00:51:34+5:302018-04-13T00:51:34+5:30

बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत.

'One-on-one pen ...' Sketchy youth eyes campaign | ‘एक वही-एक पेन...’ कृतिशील तरुणांचे डोळस अभियान

‘एक वही-एक पेन...’ कृतिशील तरुणांचे डोळस अभियान

Next

- शांतीलाल गायकवाड 

समाजमाध्यमांच्या सकारात्मक वापरातून समाजविधायक कार्य करणारा ध्येयवेड्या तरुणांचा समूह म्हणून ‘फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट’ (एफएएम) आता समाजात चर्चेचा व आदराचाही ठरतो आहे. विशेषत: या समूहाने गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतलेला ‘एक वही-एक पेन’ हा उपक्रम समाजाला आंबेडकरी विचारांचे धडे कृतीतून देत आहे. 

बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत. आजही समाजातील मोठा वर्ग विपन्नावस्थेत जगतो. त्याला शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब हेरून या तरुणांनी शिकणाऱ्या हातात वही-पेन देण्यास सुरुवात केली आहे. सन २०१५ रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर प्रथम हे अभियान राबविण्यात आले. तेव्हापासून ते सतत सुरू असून, राज्याच्या सीमा पार करून आता इतर राज्यांतही पोहोचले आहे. 

आमचे मिशनच मानवमुक्तीचा लढा देण्याचे आहे, असे सांगत प्रवीण गडकिंग (एम.ई.) म्हणाला, आम्ही एकत्र आलेलो तरुण एका जातीविशेषाचे नाहीत. आमचे जवळपास ५५ हजारांहून अधिक आॅनलाईन सदस्य आहेत. त्यात सर्व जाती-धर्मांचे आहेत. अट एकच, तो आंबेडकरी विचारधारा मानणारा हवा. रोहित शिंदे (एम.ए., एम.एस.डब्ल्यू.), मनीष नरवडे (बी.ए.) यांनी महाराष्ट्रातील विविध १२ जिल्ह्यांत ही चळवळ कशी काम करते हे सांगितले. सचिन औचरमल (स्टेनो), हर्षानंद तायडे (बी.ई.,एम.बी.ए.), निखिल गाडेकर (डी.एम.ई.) यांनी या अमूर्त मंचावरून होणाऱ्या प्रत्यक्ष कार्यक्रमांची वेगवेगळी रूपे स्पष्ट केली. त्यात जातीअत्याचाराविरुद्ध लढली जाणारी लढाई, वाढत्या असहिष्णू वातावरणात माणसामाणसांत आपुलकी निर्माण करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या टेबल सभा आदी कल्पक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

विचारशील कार्यकर्ता घडविण्याचा उद्देश

२००६ मध्ये खैरलांजी हत्याकांड घडले. संतप्त आंबेडकर अनुयायांनी आंदोलने केली. पोलिसांनी दडपशाही करून अनेकांना कारागृहात डांबले. दुखावलेले तरुण एकमेकांशी संवाद साधत होते. तेव्हा नुकताच ‘आर्कुट’ या समाजमाध्यमाचा उदय झाला होता. पुढे फेसबुक आले आणि आंबेडकरी तरुणांचा संवाद यावरून गतीने होऊ लागला. जाणिवांची देवाण-घेवाण सुरू झाली. आत्मभान येऊ लागले. जातीय अत्याचारात भरडणारा दूरदूरचा तरुण यानिमित्त एकत्र बांधला गेला. मुंबईत आमची बैठक झाली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतूनही तरुण आले. तेथे हे संघटन तयार झाले. या संघटनेची घटना आहे; परंतु त्याचा कारभार एकहाती न ठेवता प्रेसिडियमच्या माध्यमातून चालविला जातो. कृतिशील विचारवंत आणि विचारशील कार्यकर्ता घडविणे हा आमचा उद्देश आहे. 

- विश्वदीप करंजीकर, बी.ई. सिव्हिल, एम.टेक.

‘एक वही, एक पेन’ चा आग्रह 

६ डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब यांचा स्मृतिदिन. अधिक संस्मरणीय व्हावा यासाठी आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो व आंबेडकर अनुयायांकडून ‘एक वही-एक पेन’ जमा करण्यास प्रारंभ करतो. डॉ. बाबासाहेबांना व्यक्तिपूजा मान्य नाही; पण आमच्या आस्था त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. आम्ही त्यांना फूल-हार घालतोच. दिवसभरात हजारो-लाखो हार वाहिले जातात. त्यातून लाखो रुपयांची उधळण होते. दुसऱ्या दिवशी कचरा जमा होतो. शिवाय ते बाबासाहेबांच्या विचारविरोधी कृत्य ठरते. त्यापेक्षा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या शिक्षण प्रसारासाठी हातभार लावणे योग्य. त्यासाठी अनुयायांनी ‘एक वही, एक पेन’ द्यावा हा आमचा आग्रह आहे.

- असित सरवदे, एम.ए. (इकॉनॉमिक्स)

लाखांहून अधिक गरजूंपर्यंत पोहचलो 

बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी जमा केलेल्या वह्या, पेन सावित्रीबार्इंच्या जयंतीदिनी (दि.३ जानेवारी) गरजूंना वितरित केल्या जातात. आम्हाला शिक्षणाची दारे उघडणाऱ्या या मातेला अभिवादन करण्यासाठी ‘थँक्स सावित्रीमाई’ हा कार्यक्रम आयोजित करून मुला-मुलींना वह्या-पेनचे वाटप केले जाते. गेल्या चार वर्षांत २ लाखांहून अधिक वह्या-पेन या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचले आहेत. 

- दौलत सिरसवाल, बी.सी.ए. पदवीधर

Web Title: 'One-on-one pen ...' Sketchy youth eyes campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app