मराठवाड्यातील किल्ले : एक मुक्त चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:10 PM2018-07-07T16:10:00+5:302018-07-07T16:11:05+5:30

स्थापत्यशिल्पे : आजपर्यंत वर्णन केलेले मराठवाड्यातील सर्व किल्ले अनेक शतकानुशतके अखंड पहारा देत उभे आहेत. या किल्ल्यांवर फिरताना, निर्मात्यांची अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारी स्थापत्यकुशलता पाहावी की त्यांचे भौगोलिक स्थान निवडणाऱ्या त्या कोण एका मुत्सद्द्याची वाखाणणी करावी, असे कोडे आपल्याला पडते.

Forts in Marathwada: A freelance thinking | मराठवाड्यातील किल्ले : एक मुक्त चिंतन

मराठवाड्यातील किल्ले : एक मुक्त चिंतन

Next

- तेजस्विनी आफळे

मराठवाड्यासारख्या आजही पाण्याची टंचाई भासणाऱ्या प्रदेशात उपयोगात येईल अशी दुर्गांवरची सुनियोजित जलव्यवस्था एकीकडे तर दुसरीकडे कमी उंचीच्या दुर्गांमध्ये ही कडेकापरींचे कोंदण असलेल्या उंच बळकट किल्ल्यांच्या तोडीसतोड अशी सामरिक रचना...! कोण असतील ते वीर, काय घडले असेल इथे अशा सगळ्याच घटनाक्रमाबद्दल उत्सुकता वाटत राहते. काही किल्ल्यांविषयी इतिहासाने आपली कवाडं काहीशी किलकिली केलीयेत; पण काही किल्ल्यांच्या बाबतीत एखादी दंतकथा सोडल्यास बाकी सगळ्याचा अंधार आहे.

आजच्या पटकन माहिती घेण्याच्या सोशल मीडियाच्या जगात खरेच आपण या दुर्गांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय! की आपल्या वागणुकीनं अनेकांच्या वीरश्रीची प्रतीकं असलेल्या या किल्ल्यांना आपणच जणू ग्रहण लावतोय. हे पाहायची गरज निर्माण झालीये असं किल्ल्यांना भेटी देताना परत परत जाणवत राहते. तीच स्थिती एकेकाळी अनेक शत्रूंची भीतीने नुसती गाळण उडवणाऱ्या विविध आकारांच्या तोफांची. या बलदंड तोफा खरेतर ऐतिहासिक काळातील शस्त्रसज्जतेविषयी सांगतातच त्याचबरोबर पर्शिया, अबिस्सीनिया तसेच तुर्क संस्कृतीबरोबर झालेली सामरिक देवाणघेवाणीचा सज्जड पुरावा आहेत.

प्रत्येकाला ही माहिती घेण्याविषयी खूप उत्सुकता असेलच असे नाही; परंतु म्हणून या सांस्कृतिक ठेव्याला कळत (चोरी आणि सीनाजोरी तसेच आपल्या प्रेमकथेचा साक्षीदार म्हणून वापर करणे वगैरे) किंवा नकळत (तोफांवर बसून सेल्फी काढणे, त्यांच्या मूळ स्थानांवरून बेकायदेशीरपणे हलवणे वगैरे) अशी कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवणे हे दु:खदायक नव्हे का? या तोफा चोरून, विकून, वितळवून काही रूपड्यांचे काम नक्की होईल; पण तो बहुमूल्य ऐतिहासिक ठेवा परत आपल्याला मिळेल का?

दौलताबादमध्ये वस्तुसंग्रहालय उभारण्याचा स्तुत्य प्रयत्न पुरातत्व खात्याने केला. मात्र, चोरीसारख्या प्रसंगांमुळे सुरक्षा कारणास्तव हे संग्रहालय बंद ठेवावे लागले. सध्याचा अगदी ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे संवर्धनाचा... आज आपण या किल्ल्यांची डागडुजी करताना, पर्यटनविकास अशा गोंडस नावाखाली किल्ल्यांची मूळ वैशिष्ट्ये घालवत आहोत.  नळदुर्गमधील साहसी खेळनामक विनोद, रस्त्यांसाठी किल्ल्यातीलच माती चक्क जेसीबीने काढताना पुरातात्विक नीतीनियमांची झालेली पायमल्ली, जुन्या पाणी-व्यवस्थेची नासधूस, नवीन कारंजी आणि इतर बांधकाम पाहताना आपण किल्ल्यात आहोत की एखाद्या पिकनिक स्पॉटवर.. असा प्रश्न पडावा... कंधार, औशासारख्या किल्ल्यांमध्ये तटबंदीची डागडुजी झाल्यावर तिचे मूळ स्वरूप कसे होते हे आज आपल्याला सांगता येईल का हा प्रश्न पडतो.

अनेक किल्ल्यांमध्ये तुफानी वेगाने संवर्धनकार्य सुरू आहे. इथे कामे होतायत हा खचितच आनंदाचा भाग आहे. हा तुफानी वेग कामाच्या दर्जावर उलटू नये म्हणजे झाले! ही कामे किती नियोजनबद्ध रीतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालीयेत हाच संशोधनाचा भाग आहे. कुठलेही अवशेष परत पूर्वीसारखे बांधून काढायच्या आधी त्यांच्या सद्य:स्थितीचा, मूळ वास्तुवैशिष्ट्यांचा संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते अथवा पुढच्या पिढीच्या अभ्यासात किल्ल्यांची स्थापत्यरचना ही तोडक्या-मोडक्या स्वरूपातच सदर केली जाईल अशी भीती वाटते. 

(tejas.aphale@gmail.com)

Web Title: Forts in Marathwada: A freelance thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app