लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या बाम्हणी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करवून घेतले. उतारा करवून घेतला. या पूजेत बाधा येऊ नये, यासाठी गावाचे दोन्ही रस्ते पूजाकर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले. विज्ञानयुगात वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या या कृत्याची वार्ता दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत पसरल्याने एकच खळबळ माजली आहे.
तुमसर या तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर पूर्वेस असलेल्या गावात अंधश्रद्धेस खतपाणी घालणारा हा प्रकार घडला. या गावाची लोकसंख्या सुमारे १,७०० असून ४५० शेतकरी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे खोडकिडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी फवारणी आणि कीडनाशकाचा वापर करण्याचा मार्ग सोडून, असा अघोरी प्रकार केला. या पूजेसाठी गावकऱ्यांनी सल्लामसलत करून सामूहिकरीत्या वर्गणी गोळा केली. बाहेरगावाहून मांत्रिकाला पाचारण केले. त्याला मानधन देऊन मंदिरात मध्यरात्री मंत्रोच्चारासह पूजन केले. या पूजेनंतर मांत्रिकाने, लवकरच कीड नष्ट होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, असे भाकीतही केल्याचे सुत्रांनी सांगीतले.
युवकांनी रोखले रस्ते
विशेष म्हणजे, या पूजेत कसलीही बाधा येऊ नये, बाहेरील व्यक्ती पूजाकाळात गावात प्रवेश करू नये, यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून रात्री ११:०० वाजेपासून जवळपास एक तासभर गावात प्रवेश करणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. गावातील युवक रस्त्याच्या दोन्ही टोकांवर उभे होते, त्यांनी कोणालाही गावात येऊ दिले नाही किंवा बाहेरही जाऊ दिले नाही. जवळपास दीड तासानंतर पूजाविधी संपल्यावर रस्ता मोकळा करण्यात आला.
प्रशासन अनभिज्ञ
गावात घडलेल्या या प्रकाराबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. या घटनेची तालुकाभर चर्चा रंगली आहे. वैज्ञानिक जगात हा प्रकार विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे. तालुका स्तरावर तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व इतर डझनभर कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा आहे. कर्मचारी शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करतात, असा दावा करण्यात येतो. यंत्रणेच्या कार्याची ऑनलाइन माहितीही राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे नियमितपणे पाठवण्यात येते. तरीही खोडकिड्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मांत्रिकाचे दार गाठावे, हा प्रकार विचित्र ठरला आहे.