पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून
By Admin | Updated: October 28, 2014 22:52 IST2014-10-28T22:52:03+5:302014-10-28T22:52:03+5:30
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती कशी वाचवावी? या समस्येत शेतकरी आहे.

पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून
भंडारा : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती कशी वाचवावी? या समस्येत शेतकरी आहे. या पिकांना देण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तेसुद्धा भारनियमनामुळे पाणी देऊ शकत नाही. रात्रभर जागून पिकांना कसेतरी पाणी द्यावे लागत आहे.
यावर्षी आधीच निसर्गाने त्रस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून धानपिके पिके गेली. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यानंतर पावसाळा संपताना काही प्रमाणात दमदार पाऊस झाला आणि पिकांना उभारी मिळाली.
आॅक्टोबर महिन्यातवातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादूर्भाव दिसून आला. त्यामुळे हातातील पिकेही जाण्याची भिती निर्माण झाली. यातच पिकांना पाण्याची गरज असताना भारनियमनामुळे ते देता येणे कठिण झाले आहे. विहिरींमध्ये पाणी असूनही भारनियमनामुळे ते पाणी पिकांपर्यंत पोहचविणे शक्य होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातच रात्र जागून काढावी लागत आहे. जेव्हा वीज येते तेव्हा ते पाणी द्यावे लागत आहे. परंतु १५ ते २० मिनिटातच पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत होतो. अशा स्थितीत सतत शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जागलीला जावे लागत आहे. ज्यांच्याकडे घरात एकापेक्षा अधिक माणसे आहेत, अशांना पिके वाचविणे शक्य होत आहे. परंतु ज्या घरात एकटाच माणूस आहे अशा शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्याच्या प्रतिक्षेत शेतात थांबून राहणे कठीण होत आहे.
त्यातच अनेकांची शेती जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसालाही तोंड द्यावे लागत आहे. अनेक संकटातून वाचलेले पीक वन्यप्राणी आता नष्ट करीत आहेत. रानडुकरे शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावंर एका पाठोपाठ एक नैसर्गिक संकटे सुरूच आहे. डोक्यावरील कर्ज तसेच आहे. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी तयार नाही. अनेकांच्या घरची विवाह खोळंबली आहे. अशावेळी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)