विद्यार्थिनींनी वैयक्तिक समस्या कुणाला सांगाव्या? भंडारा जिल्ह्यात ४०९ शाळांत एकही शिक्षिका नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:06 IST2025-09-09T19:04:29+5:302025-09-09T19:06:31+5:30
Bhandara : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७९४ शाळा आहेत. त्यापैकी ४५७ शाळांत महिला शिक्षक आहेत. ३३७ शाळांत महिला शिक्षिक नसल्याने मुलींच्या समस्यांना वाचा फुटणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

To whom should female students tell their personal problems? There is not a single female teacher in 409 schools in Bhandara district
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुलींना शाळेत शिक्षण घेताना विविध वैयक्तिक अडचणींना सामोरे जावे लागते. काही समस्या पुरुष शिक्षकांकडे कथन करणे अशक्य ठरते. त्यामुळे शाळांमध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती अत्यावश्यक मानली जाते; मात्र ३३७ जिल्हा परिषद आणि ७२ इतर शाळांत महिला शिक्षिका नाहीत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७९४ शाळा आहेत. त्यापैकी ४५७ शाळांत महिला शिक्षक आहेत. ३३७ शाळांत महिला शिक्षिक नसल्याने मुलींच्या समस्यांना वाचा फुटणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलींना वर्गाबाहेर टुकार मुलांकडून छेडछाड होणे, कुणीतरी त्यांचा सतत पाठलाग करणे, अनावश्यक त्रास दिला जाणे, अशा समस्या भेडसावत असतात. अशावेळी शिकवायला महिला शिक्षिका असल्यास विद्यार्थिनी मोकळेपणाने आपली व्यथा त्यांच्याकडे सांगू शकतात. त्यामुळे शाळांत महिला शिक्षिकांची गरज वाढली आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षिकांचा अभाव आहे. अशा शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. शाळांमध्ये शिक्षिका असल्यास विद्यार्थिनींना उद्भवणाऱ्या अडी अडचणी व आरोग्य विषयक समस्या मांडण्यास अधिक सोयीचे व लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वैयक्तिक अडचणी, आरोग्याच्या समस्या कुणाला सांगणार?
वयात आलेल्या मुलींना शाळेत शिक्षण घेताना विविध स्वरूपातील वैयक्तिक अडचणींना सामोरे जावे लागते. काही समस्या पुरुष शिक्षकांकडे कथन करणे मुलींना अडचणीचे ठरते. त्यामुळे शाळांमध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती नसल्याचे आरोग्याच्या समस्या कुणाला सांगणार, अशी समस्या मुलींना उदभवू शकते.
इतर शाळांमध्ये ४२३ शाळेत महिला शिक्षिका कार्यरत
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा वगळता ४९५ इतर शाळा आहेत. यामध्ये यामध्ये ७२ शाळांत महिला शिक्षिका नाहित. अनेक शाळांमध्ये महिला शिक्षिकांची उणिव असल्याचे दिसून येत आहे.
समुपदेशनात अडचणी
शाळेत शिकणाऱ्या मुर्लीना सपुपदेशन करतांना देखील शिक्षिकाअभावी अडचणी उद्भवतात. महिला शिक्षिका असल्या मुलींना त्यांच्या समस्या मांडण्यास मनमोकळेपणा वाटतो, तसेच त्यांचे समुपदेशन करण्यास देखील सोईचे होते.
"जिल्हा परिषद शाळेत काही शाळांमध्ये शिक्षिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या शाळेत महिला शिक्षकांचे प्रमाण वाढविण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असून रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल."
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, भंडारा.