लिलावाआड रेतीचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:12+5:30

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश असतो. परंतु जप्तीतील रेती लिलावात घेतल्यानंतरही त्या नावावरही गोरखधंदा करण्यात येत आहे.

sand | लिलावाआड रेतीचा गोरखधंदा

लिलावाआड रेतीचा गोरखधंदा

Next
ठळक मुद्देतीन वर्षातील जप्तीची कारवाई : घरकुल बांधकामाच्या नावावर रेती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महसूल विभागाने विविध कारवाईत जप्त केलेल्या रेतीची लिलाव प्रक्रिया राबवून त्याआड रेतीचा गोरखधंदा सुरु आहे. अर्थपूर्ण व्यवहारातून रेती तस्करांसाठी हा प्रकार सोयीचा असून लिलावातील रेतीसोबतच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जाते. गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध घाटांवर हा धक्कादायक प्रकार सुरु आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश असतो. परंतु जप्तीतील रेती लिलावात घेतल्यानंतरही त्या नावावरही गोरखधंदा करण्यात येत आहे. महसूल विभागाने जप्तीतील लिलाव केलेल्या रेतीसाठ्याच्या दहापट रेती तस्कर त्या परवान्यावर नेत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जप्त केलेला रेतीसाठा हा नदीपात्राचा आसपास ठेवलेला असतो. तो साठा लिलाव घेणारे आपल्या सोईने घेवून जातात. परंतु हा जप्तीतील रेतीसाठा तस्करांसाठी कुरण ठरू पाहत आहे. याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते.
तुमसर तालुक्यात रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु आहे. येथे ट्रॅक्टर व ट्रक ची संख्याही मोठी आहे. प्रत्येक ट्रक व ट्रॅक्टरमागे हिस्सा देण्यात येतो. २ ते ५ हजार रुपये अशी किंमत ठरली आहे. गावस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे हात ओले केले जातात. त्यामुळे येथे कारवाई होत नाही.
तुमसर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी रेतीतस्करीचा गोरखधंदा सुरु आहे. याबाबत अधिकारी मौन बाळगून असून पोलीस कारवाईही करताना दिसत नाही. तुमसर तालुक्यात तर सध्या रेती तस्करीला उधाण आले आहे. एलसीबीच्या अधिकाºयांची खांदेपालट झाल्यानंतरही कुठेच कारवाई दिसत नाही.

घरकुल रेतीचा परवाना
घरकूल बांधकामाच्या नावावर महसूल विभागाने एक ते दीड बास रेतीचा परवाना घरकुल मालकांना दिला आहे. परंतु या घरकूल परवान्यावरही आता रेतीची तस्करी केली जात आहे. असा प्रकार मोहाडी तालुक्यात उघडकीस आला. एकीकडे लाभार्थ्यांना घरकूलासाठी रेती मिळत नाही. परंतु दुसरीकडे त्याच परवान्यावर रेतीची वाहतूक होत आहे.
बिंग फुटणार
तुमसर तालुक्यातील रेती लुटीची गंभीर दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली आहे. लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तांचे कात्रण राज्याच्या पर्यावरण मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. गत पाच वर्षातील रेती तस्करीचा आढावा घेतला जाणार असून संबंधित मंत्रालयाने याबाबत माहिती मागविली आहे. गोपनीय पध्दतीनेही बावनथडी आणि वैनगंगा नदीची पाहणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू