आत्महत्येचा बनाव अन् तरुण सापडला जिवंत; ४ किमी पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 03:47 PM2022-03-10T15:47:59+5:302022-03-10T16:09:18+5:30

अनिलचा पल्लवी नामक तरुणीशी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला.

rumours spread of a man committing suicide but he found alive | आत्महत्येचा बनाव अन् तरुण सापडला जिवंत; ४ किमी पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद

आत्महत्येचा बनाव अन् तरुण सापडला जिवंत; ४ किमी पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद

Next
ठळक मुद्देदेव्हाडा परिसरातील घटना मुलगा जिवंत असल्याचे पाहून पालकांच्या जीवात जीव

युवराज गोमासे

भंडारा : प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाचा पत्नीसोबत वाद झाला. दुचाकीने घरून निघून गेला. पती बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दिली. अशातच तलावाजवळ एक दुचाकी आणि पाण्यात बूट व मोजे दिसले. तरुणाचे वडीलही पोलीस ठाण्यात पोहचले. काही वेळातच करडी पोलीस घटनास्थळी पोहचले. शोधाशोध सुरू झाली. एका झुडपात लपून बसलेल्या तरुणाने पोलीस पाहताच पळ काढला. अखेर चार किमी पाठलाग करून त्याला पोलिसांनी जेरबंद केले. हा थरार मोहाडी तालुक्यातील देव्हाडी साखर कारखाना परिसरात बुधवारी सकाळी अनेकांनी अनुभवला. मुलगा जिवंत असल्याचे पाहून पालकांच्या जीवात जीव आला.

अनिल कुसन हातझाडे (२६) रा. इंजेवाडा, ता. भंडारा असे त्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या नागपूरच्या सीतानगरात कामानिमित्त वास्तव्याला आहे. अनिलचा पल्लवी नामक तरुणीशी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला. इकडे इंजेवाडातही आला नाही. पती घरी न आल्याने काळजीत पडलेल्या पत्नीने ४ मार्च रोजी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नातेवाईक अनिलचा शोध घेत होते.

दरम्यान, बुधवारी सकाळी देव्हाडा साखर कारखाना परिसरातील तलावाच्या पाळीवर दुचाकी (क्र. एमएच ३६ एएच ०८०१) काही व्यक्तींना दिसली. पाण्यात बूट व मोजे तरंगताना दिसत होते. आत्महत्या झाल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले. अशातच सकाळी अनिलचे वडील करडी ठाण्यात पोहचले. ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर देव्हाडा बिटचे हवालदार लंकेश राघोर्ते व अर्पित भोयर यांनी शोध सुरू केला. संपूर्ण तलाव शोधला पण मृतदेह दिसत नव्हता. परिसराचा शोध सुरू झाला. त्यावेळी झुडपात लपलेला एक तरुण पोलिसांना पाहताच पळू लागला. अखेर चार किमी पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी अनिलला वडिलांच्या स्वाधीन केले. त्याला उपचारासाठी तुमसरच्या रुग्णालयात नेण्यात आले.

बघ्यांची झाली मोठी गर्दी

कुणीतरी आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरताच तलावावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. नागरिकांच्या मदतीने संपूर्ण तलाव शोधून काढण्यात आला. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. काय झाले, कुठला तरुण आहे, याची चौकशी नागरिक करू लागले. अखेर तरुण जिवंत सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र दिवसभर याच घटनेची परिसरात चर्चा होती.

Web Title: rumours spread of a man committing suicide but he found alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.