Revival of Lake Kinhi-Gadegaon | किन्ही-गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन

किन्ही-गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन

ठळक मुद्देवन्यजीवांसह चार हजार लोकसंख्येला होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा तलावांचे सामाजिक बांधिलकीतून पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूजा फाउंडेशनच्या पुढाकारातून भंडारा तालुक्यातील किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या तलावात पाण्याचा मोठा साठा झाला असून याचा फायदा वन्यजीवांसह परिसरातील चार हजार लोकसंख्येला होणार आहे.
किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली. ५३ हेक्टर परिसरातील तलावावर ६० लाख रुपये खर्च करून तलाव पुनरूज्जीवीत करण्यात आला.
यासोबतच या तलावाच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. सद्यस्थितीत या तलावाच्या संचय क्षमतेत ६५ टक्के वाढ होणार आहे. पावसाळ्यात याचा अनुभवही परिसरातील नागरिकांना आला आहे.
पूर्वी उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये हा तलाव आटून जायचा. पाण्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. आता या तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल होतील. होसूर येथे ६० हेक्टरपर्यंत जलक्षमता तसेच ४.५ हेक्टर तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे आसपासच्या परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा मिळेल. सिंचन क्षमता वाढेल आणि मासेमारीसाठीही हा तलाव उपयुक्त ठरणार आहे.
पुनरूज्जीवन तलाव ताब्यात देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम, सरव्यवस्थापक एम.एम. लखोटे, मनुष्यबळ उपाध्यक्ष टी.शशीकुमार तसेच हिंदूजा फाउंडेशनचे संचालक नियती सरीन उपस्थित होते. जलजीवन कार्यक्रमांतर्गत सीएसआर प्रकल्पान्वये या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यात आले.

तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होईल
सरव्यवस्थापक एम.एम. लखोटे यांनी या कामाची माहिती दिली. तलावाचे पुनरूज्जीवन करताना पर्यावरणासोबतच समाजातील घटकांसाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता हा प्रकल्प साकारण्यात आला. या तलावाच्या निवडीमध्ये एनव्हायरमेंटालिस्ट फाउंडेशन आॅफ इंडियाने महत्वाची भूमिका वठविली. किन्ही व गडेगाव या दोन्ही ग्रामपंचायतला या तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. सोबतच कोका अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही उन्हाळात पाण्यासाठी हा तलाव मोठा आधार ठरणार आहे. ही योजना दीर्घकाळ जलक्षमता कायम ठेवत उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना पुरेसा ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन झाले असून पावसामुळे हा तलाव तुडूंब भरला आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षीत करीत आहे.

Web Title: Revival of Lake Kinhi-Gadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.