भंडारा : जिल्ह्यातील सातही तालुक्यात धान पिकावर खोडकिडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला अहे.सध्या भारी धान पिक हे फुटवे फुटण्याच्या व हलका धान काही ठिकाणी गर्भावस्थेतच आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्व्हेक्षक व नियंत्रक यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात खोडकिडीचे प्रमाण मोहाडी, भंडारा, पवनी, तुमसर, लाखांदूर, लाखनी, साकोली तालुक्यात काही गावात आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास आढळून आलेला आहे. खोडकिडीचे पतंग समोरील पंख पिवळे, मागील पांढरे तर समोरील पिवळ्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. अंडी पुंजक्याच्या स्वरुपात असून पिवळसर तांबड्या तंतूमय धाग्यांनी पानाच्या शेंड्यावर झाकलेली असतात. पूर्ण वाढ झालेली अळी २० मि.मी. लांब पिवळसर व पांढरी असते. अळी खोड पोखरते. त्यामुळे रोपाचा गाभा मरते व फुटवा सुकतो. यालाच किडग्रस्त फुटवे, गाभेमर म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. यालाच पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. खोडकिडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल् यास म्हणजेच ५ टक्के नुकसान ग्रस्त फुटवे प्रती चौ.मि. क्षेत्रातदिसून आल्यास कारटॅप हायड्रोक्लोराईड ४ जी, २५ किलो किंवा कार्बोफ्युरॉन ३ जी, २५ किलो किंवा फोरेट १० जी, १० किलो किंवा फिप्रोनिल ०.३ जी, २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे शेतात टाकावे. तसेच संततधार पावसानंतर आता हवामान उष्ण व कोरडे आहे. अशा परिस्थितीत शेतात पाणी न राहिल्यास लष्करी अळीचे प्रमाण वाढण्यास वाव आहे. या किडीची मादी २००-३०० अंडी पुंजण्याच्या स्वरुपात धानावर, गवतावर घातले अंडी करड्या रंगाच्या केसांनी झाकलेली असतात. पूर्ण वाढ झालेली अळी लठ्ठ, मऊ, हिरवी, काळी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. या अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करतात व शेत फस्त करतात. अळ्या रात्री कार्यक्षम असून दिवसा धानाच्या बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. अळ्या पाने कडेकडूनच कुरतडतात. पिक लोंबी अवस्थेत असताना अळीचे धानाच्या लोंब्या कुरतडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला असतो. (शहर प्रतिनिधी)
धानपिकावर खोडकिडा लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 13, 2014 23:40 IST