आता पोलिसांच्याही सुटीचे कॅलेंडर !

By Admin | Updated: April 22, 2017 00:38 IST2017-04-22T00:38:16+5:302017-04-22T00:38:16+5:30

राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते,

Now the police's holidays calendar! | आता पोलिसांच्याही सुटीचे कॅलेंडर !

आता पोलिसांच्याही सुटीचे कॅलेंडर !

भंडारा : राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते, तसे त्यांना अर्जित रजा, सुट्टी मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सुटीचे कॅलेंडर बनविले जाणार आहे. प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी साप्ताहिक सुटी आणि वर्षातून किमान एकदा १५ दिवस अर्जित रजा मिळणार आहे.
येत्या आर्थिक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे कॅलेंडर बनविण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिले आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे सण, उत्सव, निवडणुका व आपत्कालीन स्थितीत बंदोबस्तात पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुटी व रजांवरही अनेकवेळा गदा येते. त्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी, प्रत्येक अंमलदाराच्या १५ दिवसांच्या अर्जित रजेचे नियोजन आतापासून करावयाचे आहे. त्याच वेळी कोणत्याही स्थितीत त्यांच्या साप्ताहिक सुटीवर गदा येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावयाची आहे. एका दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनुष्यबळापैकी १० टक्क्यांहून अधिक अंमलदार रजेवर असणार नाहीत, याची काळजी घेऊन रजेचे कॅलेंडर बनवायचे असून, त्याबाबत दर महिन्याच्या पाच तारखेला अहवाल उपअधीक्षकांकडे प्रभारी अधिकाऱ्यांनी सादर करायचा आहे. पोलीस अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून हे काम करून घ्यायचे आहे. अर्जित रजेप्रमाणे गणेशोत्सव काळातील बंदोबस्तामुळे रजा घेता येत नसल्याने, त्या धनार्जित रजेमध्ये वर्ग करून कोषागार कार्यालयातून रक्कम जमा करण्यात येतील. प्रत्येक पोलिसाला हक्काची रजा मिळावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांनी सुट्टीचे कॅलेंडर बनविले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील आयुक्तालये व अधीक्षकांनी कार्यक्षेत्रात नियोजन करण्याची सूचना अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Now the police's holidays calendar!