कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:03+5:302021-07-07T04:44:03+5:30
भंडारा : जिल्ह्यामध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१-२२ ही कार्यवाही ‘आजादी का अमृत ...

कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान
भंडारा : जिल्ह्यामध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१-२२ ही कार्यवाही ‘आजादी का अमृत महोत्सवाचे’ औचित्य साधून राबविण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठ व क्षय रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. समाजातील कुष्ठ व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी १९ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक संचालक तथा जिल्हा कुष्ठरोग अधिकारी भंडारा डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विना विकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषध उपचार देणे तसेच विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाची संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृतीद्वारे क्षयरोगाची लक्षणे तपासणी, उपचार, औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध सोयी सुविधा जसे की, प्रत्यक्ष रुग्णांना निक्षय पोषण आहार योजने अंतर्गत प्रतिमहा ५०० रुपये अनुदान देण्यात येते. मोफत क्ष- किरण तपासणी, थुंकी तपासणी, एमडीआर, रुग्णाची तपासणी इतर सर्व सोयी सुविधा शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील ७७४ गावांमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोधून मोहीम माहे जुलै ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, आरोग्य सेवक पुरुष व स्त्री एएनएम तसेच प्रशिक्षित बरे झालेले रुग्ण यांचे मार्फत कुष्ठरोगाबाबत निकषाबाबत सर्व व्यक्तींची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका इत्यादींची एकूण १,०४९ टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परीक्षणासाठी एकूण जिल्ह्यात १०५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून व संशयित रुग्णांची थुंकी नमुने, एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून रोगाचे निदान करणे आणि औषध उपचार सुरू करणे याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली. सभेमध्ये जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.