बिबट्या पडला विहिरीत
By Admin | Updated: February 25, 2015 01:11 IST2015-02-25T01:11:21+5:302015-02-25T01:11:21+5:30
तालुक्यातील वलनी - आसगाव शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका इसमावर हल्ला केला. यात इसम किरकोळ जखमी झाला असला तरी ...

बिबट्या पडला विहिरीत
आसगाव / पवनी: तालुक्यातील वलनी - आसगाव शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका इसमावर हल्ला केला. यात इसम किरकोळ जखमी झाला असला तरी बिबट्या रस्त्यालगतच्या कठडे नसलेल्या विहिरीत पडला. ही घटना मंगळवारी सकाळी वलनी-आसगाव शेतशिवारात घडली.
जंगलव्याप्त तालुका असलेल्या पवनी येथून जवळच असलेल्या वलनी आसगाव शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून हिंस्त्र पशूंनी अनेकांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारला सकाळी वलनी शेतशिवारातील शामराव गभणे यांच्या उसाच्या मळ्यात एक बिबट दबा धरून बसला होता. ही बाब परिसरातील नागरिकांना लक्षात आली. त्याला बघणाऱ्यांची तोबा गर्दी उसळली. दरम्यान तिथून जाणाऱ्या इसमावर बिबट्याने झडप घातली. यात सदर इसम किरकोळ जखमी झाला. मात्र झडप घेतल्यानंतर बिबट्या रस्त्यालगत असलेल्या व कठडे नसलेल्या विहिरीत पडला.
यात इसमासह बिबट्याही किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहितीवरून वनाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या खोल पाण्यात बिबट्या पडल्याने तो जखमी झाला. त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाने दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले. वृत्तलिहिपर्यंत विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
बिबट ज्या विहिरीत पडला त्या विहिरीचा व्यास कमी असल्याने बिबट जखमी झाला आहे. अशा स्थितीत त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनकर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
इसम जखमी
आसगाव येथील अनिल कोरे हा मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करीत आहे. लोकमतची एजंसी त्यांच्याकडे असल्याने वृत्तपत्राचे वाटप करण्यासाठी आज नित्याप्रमाणे सायकलने वलनीकडे निघाला. ऊसाच्या तांड्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांना पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.