दिवाळीची साफसफाई महिलेला पडली महागात, अज्ञात चोरट्याने दागिने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 18:38 IST2021-10-28T18:17:54+5:302021-10-28T18:38:51+5:30
दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणे एका महिलेला महागात पडले असून बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्याची पर्स अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिवाळीची साफसफाई महिलेला पडली महागात, अज्ञात चोरट्याने दागिने केले लंपास
भंडारा : दिवाळी सणानिमित्त नातेवाइकाच्या मदतीने घराची साफसफाई करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. बेडरूममधील दिवाणखाली ठेवलेली दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली.
८७ हजार रुपयांचे दागिनेचोरीस जाण्याची घटना भंडारा शहरालगतच्या डॉक्टर कॉलनीतील तरुणनगरात गुरुवारी उघडकीस आली. साकोली येथील सिव्हिल वॉर्डातील जयश्री किरण येवले या सध्या बेला येथे डॉक्टर कॉलनीत राहतात. त्यांनी शशिकांत घरडे यांच्याकडे घरभाड्याने घेतले आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी घराची साफसफाई सुरू केली. यासाठी आपल्या नातेवाईक दिनेश्वरी राकेश वाडीचार (३२, रा. बेला) यांची मदत घेतली. घरात साफसफाई सुरू असताना बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्यांची पर्स ठेवली होती. ही पर्स पाहण्यासाठी गेल्या असता पर्स दिसून आली नाही. संपूर्ण घरभर शोध घेतला तरी थांगपत्ता लागला नाही. अखेर भंडारा ठाणे गाठून तक्रार दिली.
या बॉक्समध्ये १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चपला कंठी, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, पाच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातील रिंग, सोन्याचे दोन डोरले, आठ बारीक मनी असा ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार दिली. या चोरीची तक्रार भंडारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र चोरट्याचा थांगपत्ता लागला नाही. या चोरीचा तपास भंडारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे करीत आहेत.