तंबाखूजन्य पदार्थ निर्मूलनाची अंमलबजावणी शून्य
By Admin | Updated: May 31, 2014 23:16 IST2014-05-31T23:16:07+5:302014-05-31T23:16:07+5:30
सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला. परंतु या अध्यादेशाचे पालन होताना मात्र दिसत नाही.

तंबाखूजन्य पदार्थ निर्मूलनाची अंमलबजावणी शून्य
देवानंद नंदेश्वर - भंडारा
सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला. परंतु या अध्यादेशाचे पालन होताना मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयाच्या भोवती तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री सुरु आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना कारवाई कागदोपत्री ठरली आहे.
तरुणांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट या पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. शासनाला या उत्पादनातून कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार करता यावर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक संस्थांनी तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यासाठी शासनावर दबाव टाकला असता तंबाखू उत्पादित वस्तूंवर वैज्ञानिक इशार्याचा मजकूर व चित्र प्रकाशित करून शासनाने दुष्परीणाम सांगितले आहे. शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. शासन नियमाप्रमाणे या वस्तूची विक्री होत असली तरी मानवी आरोग्यासाठी या उत्पादनावर वैधानिक इशार्यांचा मजूकर व चित्र प्रकाशित करण्याची सक्ती शासनाने केली.
तंबाखूमिश्रीत उत्पादित पदार्थाचे शाळकरी मुलापासून तर वृद्धांपर्यंत व्यसन आहे. सार्वजनिक ठिकाणी युवक सिगारेटचे खुलेआम सेवन करीत धूम्रपान विरोधी कायद्याची पायमल्ली करीत आहे. विविध ठिकाणी उभारण्यात येणार्या पानटपरीवर युवकाची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या व्यसनामासून होणार्या दुष्परिणामाची कल्पना असतानाही युवक मोठय़ा प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे.
कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. प्रशासनाला या उत्पादनाबाबत कर मिळत आला तरी आरोग्याचा विचार झाला पाहिजे. यावर शासनाने योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
गुटखा व सुपारीचा खर्रा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात तरुण आणि पुरुषांचे प्रमाण अधिक असले तरी शालेय मुले व महिलांचे खर्रा खाणे चिंताजनक आहे. जिल्ह्यात अनेक पानटपर्यांवर दिवसाकाठी सुमारे आठ दहा पोती सुपारी ‘खर्रा’च्या नावाखाली नागरिक फस्त करीत आहेत. खर्रा खाणे मानवी शरीराला घातक असले तरी याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाहीत.
राज्य शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध असताना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात गुटख्याच्या पुड्या व खर्रा प्रसिध्द आहे. कामावर जाणारे मजूरवर्ग, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी शिदोरी नेण्यासाठी एकदाचे विसरतील मात्र खर्रा नेण्यासाठी विसरत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
एक व्यक्ती दिवसाकाठी ४ ते ५ खर्रा खातो. काही दुकानांमध्ये एक ते दोन किलो सुपारीचा खर्रा तयार करण्यात येतो. ओला खर्रा खाणार्यांचे प्रमाणही अधिक आहे. हा खर्रा बनवून तयार ठेवण्यात येतो. ग्राहक येताच त्याच्या हातात खर्रा मिळत असल्याने या खर्र्याचे शौकिन वाढले आहेत.
सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. लग्नाध्ये बँड हे मनोरंजनाचे मुख्य साधन आहे. या बँडमुळे लग्न टाईम बेटाईम ठरली आहे. यात तरूणवर्ग मद्याच्या आहारी मोठय़ा प्रमाणात जातानी पाहत आहोत. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गुटखा, तंबाखू विकणे कायद्याने दंडनिय गुन्हा आहे. तरीपण आजच्या तरूणाच्या तोंडात लग्नाच्यावेळी व इतरवेळी गुटखा नसेल तर नवलच. गावागावात थंडपेयाची, पाणपोई दिसणार नाही पण गुटखा दुकान मात्र राजरोसपणे उभे दिसतात. पानठेल्यावर झुंबड उभी दिसेल तिथे शाळा, कॉलेज परिसरात ही सर्रास गुटखा विकला जातो. सिगारेट ओढणे फॅशन ठरली आहे.
जिल्ह्यात लग्नसराईत पान दुकानदारांना चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. सदर प्रतिनिधीने आज फेरफटका मारुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास ६0 टक्के नागरिक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे यंत्र दिसून आले. बहुतांश पानठेल्यावर बालमजूर खर्रा घोटण्याचे काम करीत असताना दिसून आले.