पवनी वनपरिक्षेत्रात अवैध उत्खनन; टिप्परमधून सुरु होती मुरुमाची वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:16 IST2026-01-07T19:15:28+5:302026-01-07T19:16:32+5:30
Bhandara : वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सावरला सहवनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आय. एच. काटेखाये आणि गुडेगावचे बिटरक्षक जी. एन. नागरगोजे हे गुडेगाव बिटातील कक्ष क्रमांक २३८ (संरक्षित वन) मध्ये नियमित गस्त घालत होते.

Illegal mining in Pawani forest area; Moringa was being transported in tippers
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी: पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुडेगाव बिटात वनविभागाने मंगळवारी (६ जानेवारी) मोठी कारवाई केली. संरक्षित जंगलात पोकलैंड मशीनच्या साहाय्याने मुरुमाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून, या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सावरला सहवनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आय. एच. काटेखाये आणि गुडेगावचे बिटरक्षक जी. एन. नागरगोजे हे गुडेगाव बिटातील कक्ष क्रमांक २३८ (संरक्षित वन) मध्ये नियमित गस्त घालत होते. यावेळी त्यांना जंगलात पोकलैंड मशीनद्वारे मुरुमाचे अवैध खोदकाम सुरू असल्याचे आणि ट्रकद्वारे त्याची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी शिवशंकर तिमाजी मेश्राम (मोखरा), विठ्ठल लकडूजी मस्के (मांगली), सुशील रवींद्र बोरकर (गायडोंगरी), संजय कोल्हे (गोसे) या चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो वन्यजीव) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि.के. नागदेवे यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून एक पोकलैंड मशीन व तीन टिप्पर जप्त केले.
सदर प्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २ ३३(१) व ५२ अन्वये वनगुन्हा दाखल् करण्यात आला आहे. सर्व वाहने जप्त करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास व्हि.के. नागदेवे करीत आहेत.
एवढी हिम्मत कुणाच्या बळावर ?
चक्क वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन टिप्परमधून वाहतूक सुरु होती. हा संपूर्ण प्रकार चक्रावून टाकणारा आहे. या परिसरात वनविभागाचे फिरते पथक कार्यरत आहेत. अधिकारीही दौऱ्यावर असतात. तरीही एवढी हिम्मत संबंधित व्यक्तीने कुणाच्या बळावर केली, हा प्रश्न मात्र कायम आहे. या कारवाईत टिप्पर चालक आणि पोकलैंड चालकाला अटक केली असली तरी खरे मोहरे बाहेरच आहेत.