मंदिराच्या गाभाऱ्यात इसमाचा खून
By Admin | Updated: December 7, 2014 22:44 IST2014-12-07T22:44:24+5:302014-12-07T22:44:24+5:30
तालुक्यातील खुटसावरी येथील एका शेतशिवारात असलेल्या माता मंदिरात सुरेंद्र धांडे या इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला. ही घटना आज रविवारला सकाळी उघडकीस आली.

मंदिराच्या गाभाऱ्यात इसमाचा खून
खुटसावरी येथील घटना : पौर्णिमेच्या रात्री घटना घडल्यामुळे परिसरात तर्कवितर्कांना ऊत
मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथील एका शेतशिवारात असलेल्या माता मंदिरात सुरेंद्र धांडे या इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला. ही घटना आज रविवारला सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली असली तरी माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती.
मोहाडीच्या पश्चिमेला आठ कि.मी. अंतरावर खुटसावरी हे लहानशे गाव आहे. तेथील सुरेंद्र वासुदेव धांडे या इसमाची माता मंदिरात निघृण खून करण्यात आला. मृतदेहाजवळ कुंकु, अक्षता, भात व नारळ ठेवलेले घटनास्थळावर आढळून आल्यामुळे प्रथमदर्शनी हा नरबळीचा प्रकार असल्याचे दिसून येते. परंतु, त्याचवेळी या घटनेमागील वास्तव वेगळेच असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. ही घटना दत्त जंयतीच्या पौर्णिमेच्या रात्री घडल्याने हा नरबळीचा प्रकार असावा, असेही काहींचे म्हणने होते.
शनिवारला सुरेंद्रने शेतावर धानाची मळणी केली. मळणीनंतर धान शेतातच ठेवले होते. रात्री जेवण आटोपल्यानंतर धानाचे पोते सुरक्षित आहेत का? हे बघण्यासाठी सुरेंद्र रात्री दहा वाजता शेतावर गेला. गावापासून शेत अर्धा कि.मी. अंतरावर आहे. धानाचे पोते बघण्यासाठी गेलेला सुरेंद्र घरी परतलाच नाही. जावई घरी कां परतले नाही हे बघण्यासाठी सुरेंद्रचा साळा ईश्वर मते हा शेताकडे गेला. ईश्वरने त्या परिसरात शोध घेतला. मात्र त्याला तो सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या शेतावर शोध घेतला असता शेतावरच गावचे श्रध्दास्थान असलेल्या माता मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताच्या थारोळ्यात सुरेंद्रचा मृतदेह पडून होता. सुर्योदयापूर्वीच या घटनेचे वार्ता गावपरिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलिस पाटील सीमा बिसने यांनी मोहाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
ज्या ठिकाणी सुरेंद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या ठिकाणी शिजलेला भात, नारळ, कुंकुवाने लाल केलेले अक्षता आणि शिवाय मृतदेहाजवळ इंजेक्शन (सिरींज) पडून होती. मातेच्या मूर्तीवर रक्त होते. सुरेंद्रच्या गळ्यावर व छातीच्या ठिकाणी शस्त्राचे वार होते. पोलिसांनी घटनास्थळ काही वेळासाठी सिल केले होते. घटनास्थळाशेजारच्या बांध्यातही रक्ताचे डाग दिसून आले. मंदिरात चपलाही दिसून आले. मृत सुरेंद्रला दोन भाऊ असून एक नागपुरात तर दुसरा गावातच वेगळा राहतो. सुरेंद्रचा साळा ईश्वर मते हा काही दिवसांपासून त्यांच्याकडेच राहत आहे. सुरेंद्रला पत्नी व तीन वर्षाची मुलगी आहे. सुरेंद्रकडे तीन एकर शेती आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, मोहाडीचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक एस.बी. चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सदर प्रकार नरबळीचा की अन्य कारणासाठी खून करण्यात आला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
(तालुका प्रतिनिधी)