गावात लोककला सादर करणारे अनेक कलाकार आहेत. अशा ग्रामीण कलाकारांना मोठ्या पडद्यावर आणण्याचे काम अभिनेता, लेखक व दिग्दर्शक प्रवीण मोहारे करीत आहेत. रिकाम्या हाताने मुंबईत स्थायिक होणे हे अग्निदिव्यच असते. त्यापलीकडे फिल्मी दुनियेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे अवघड जाते. पण, संकल्प, संयम, धैर्य, मेहनत या कसोटीवर अनेक खस्ता खाल्लेल्यांना उजेडाच्या प्रकाशवाटा मिळत असतात. म्हणतात ना ''हर मैदान फ़तेह हो जाता है, अगर मेहनत और लगन की सतह में कोई कमी ना हो''. अगदी अशीच मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील प्रवीण मोहारे यांची फिल्मी कहाणी आहे. सोळा वर्षेदरम्यान नागपूर, मुंबईत वेटर, रिक्षाचालक, भाजी विक्री, केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड प्रतिनिधी म्हणून व हाताशी येईल ती कामे करण्याची तयारी करून प्रवीण मोहारे आज मुंबईत स्थायिक झाला आहे. या संघर्षात त्याच्या वाट्याला वेदनादायक प्रसंग आले. त्या प्रसंगावर मात व संघर्ष करून त्यांने फिल्मी दुनियेत स्वतःची ओळख बनविली आहे. प्रवीण मोहरे यांनी काही चित्रपटात काम केल आहे. त्याच अनुभवाच्या बळावर तो स्वतः प्रेमाचा शिरच्छेद या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटात भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण कलावंतांना संधी दिली आहे. या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच काम करीत आहे. तसेच मुंबई प्राईम फिल्क्स वितरण कंपनीचे मालक व अभिनेता राकेश भोसले, अभिनेत्री म्हणून प्रतीक्षा शेंडे आईपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
सहकलाकार अभिनेत्री वेदिका अनवेकर काम करणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील खुशाल कोसरे, राजू मोहारे, राकेश वहिले आदी कलावंत मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. प्रेमभंग तसेच सामान्य तरुण नक्षलवादी का होतो, याचे रेखाटन चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे विदर्भात झाल्याचे कधी बघायला मिळाले नाही. काही अपवादात्मक शूटिंग सोडल्यास भंडारा जिल्हा निसर्ग सान्निध्याने नटलेला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या मोठ्या निर्माता, दिग्दर्शकांना भंडारा जिल्ह्यात चित्रीकरण करणे योग्य स्थळे आहेत, याची माहिती व्हावी, यासाठी प्रवीणने त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण मोहाडी, तुमसर तालुक्यातील वैनगंगा (माडगी) नदी, बावनथडी प्रकल्प येथील परिसरात केले आहे. यानंतर गायमुख, आंबागड, चांदपूर, रामटेक आदी ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
बॉक्स
वडिलांकडून वारसा
प्रवीण मोहारे यांचे वडील तेजराम मोहारे यांनी पौराणिक विषयावर अनेक नवटंकी नाटकांचे लेखन व कलाकार म्हणून काम केले आहे. तोच वारसा थोरल्या मुलाने पुढे नेला. धाकट्या प्रवीण यांना लेखन करण्याचे बाळकडू लहान असतानाच मिळाले. आता त्यांनी त्या बळावर मराठी चित्रपटाच्या कथालेखनाचे कार्य करून मोठी झेप घेतली आहे.
दिवाळीत येणार चित्रपट
‘प्रेमाचा शिरच्छेद’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग होत आहे. दिवाळीअखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिग्दर्शक प्रवीण मोहारे यांनी सांगितले.