‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:45 IST2025-09-22T17:44:26+5:302025-09-22T17:45:18+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण : सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम

'Even if you spray the medicine, it washes away' 'Karpa' disease wreaks havoc on 1.82 lakh hectares in Bhandara!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्न साधन असलेली धान शेती आता धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळे करपा रोग वेगाने पसरल्याने तब्बल १ लाख ८२ हजार हेक्टरवरील पीक बाधित होण्याची भीती वर्तविली जात आहे. सातही तालुक्यांत हा रोग झपाट्याने वाढत असून, भातपिके तांबूस व पेंढ्यासारखी दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात आठवडाभरापासून आकाशातील ढग हटेनात, पावसाचा मारा थांबेना आणि औषधांची फवारणी केली, तर ती लगेचच वाहून जाईल, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत. कृषी खात्याने रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या फवारणीचे मार्गदर्शन केले असले, तरी परिस्थिती 'जैसे थे'च आहे. शेतामध्ये पीक वाचविण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी औषधे लागलीच वाहून जातात. त्याचा काहीही फायदा दिसत नाही, अशी खंत विनोद पचघरे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
मे महिन्यापासून अवकाळीची मालिका
जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची मालिका सुरू झाली. सुरुवातीला पिके हिरवीगार झाली, परंतु मागील महिनाभरापासून सतत पाऊस सुरू राहिल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. भातपिकाला उष्णतेची गरज असताना आभाळ सतत दाटून येत असल्याने शेतकरी डोळ्यांसमोर उभी केलेली शेती नष्ट होताना पाहत आहेत.
गत वर्षीही सोसावे लागले नुकसान
मागच्या वर्षीही खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे यंदा पुन्हा अशी वेळ येणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अतिवृष्टीने उत्पादन घटण्याचा अंदाज
सध्या हलके वाणाचे धान पीक फुलोऱ्यावर आहे. तर भारी वाणाचे धान गर्भावस्थेत आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास फुलो-याचे मोठ्या प्रमाणात होत आहे. परागीकरणाची प्रक्रिया अडचणीत येत असल्याने धान पिकाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच अतिवृष्टी व वादळाने धान पीक जमिनीवर लोळले असल्याने मातीमोल ठरत आहे.
उन्हाळीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित
जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी पावसाने उन्हाळी धान पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु, यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणात घोळ झाल्याने शेतकऱ्यांकडून फेर चौकशीची मागणी होत आहे.
"जिल्ह्यात हलके धान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह रोजच पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल आहे. हाती आलेले धान पीक नुकसानग्रस्त होऊन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे."
- राधेश्याम आगासे, शेतकरी निलज खुर्द.