बुद्धिमानचा मृत्यू थंडीने की खून? विरली खुर्द गाव हादरले; तरुणाचा संशयास्पद मृत्यू चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:38 IST2025-11-10T14:35:47+5:302025-11-10T14:38:45+5:30
Bhandara : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) आणि त्यानंतर आथली येथील खून प्रकरणानंतर आता विरली (खुर्द) येथे एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले आहे. ८ नोव्हेंबरला गावातीलच काही लोकांनी बुद्धीमान याला मारहाण केल्याची चर्चा आहे.

Did Buddhiman die of cold or murder? Virli Khurd village shook; Suspicious death of young man in discussion
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर / विरली (बु.) (भंडारा) : एका ३५ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत घरासमोरच मृतदेह आढळला. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील विरली (खुर्द) येथे उघडकीला आली. बुद्धिमान धनविजय रा.विरली (खुर्द) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असला तरी मृत्यू नेमका कशाने झाला? हा नैसर्गिक मृत्यू की हत्या ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तपासासाठी पाच जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) आणि त्यानंतर आथली येथील खून प्रकरणानंतर आता विरली (खुर्द) येथे एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले आहे. ८ नोव्हेंबरला गावातीलच काही लोकांनी बुद्धीमान याला मारहाण केल्याची चर्चा आहे. तो थंडीत रात्रभर बाहेर झोपून राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला कुणीकुणी मारहाण केली, त्याला मारहाण करीत गावाच्या बाहेर नेण्यात आले काय? या चर्चेवरही पोलिसांचा तपास सुरु आहे. शवविच्छेदन अहवालने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
एका व्यक्तीने थेट दिली पोलिसांना माहिती
या घटनेची माहिती गावातीलच एका व्यक्तीने पोलिसांना दिली. माहिती होताच साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, राजेंद्र कुरुडकर, प्रमोद टेकाम, जयेश जवंजारकर, सतीश सिंगनजुडे, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, विनोद मैंद, विकास रणदिवे, ओमकार सपाटे, मुरलीधर धुर्वे, किशोर टेकाम, फुलचंद मडावी, अंतेश्वर झिंकवाड यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. लाखांदूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृत पावलेल्या बुद्धीमानच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याने हा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वृत्त लिहीपर्यंत लाखांदूर पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान मृतकाच्या मामाने सकाळच्या सुमारास लाखांदूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.