नाना पटोले : भंडारा-तुमसर रस्त्याचे भूमिपूजनतुमसर : शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांना जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व मानवी जीवनात रस्त्यांना आहे. शहर व गावांना सर्वांगीण विकासाकरिता गुणवत्तापूर्ण रस्त्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.भंडारा-मोहाडी-तुमसर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. अतिथी म्हणून सरपंच योगेश हलमारे, कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, मोहाडीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे, जिल्हा परिषद सदस्य गीता माटे, पंचायत समिती सदस्य मंजुषा गभने, भाग्यश्री चामट, मालीनी वहिले उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मनसर-गोंदिया-बालाघाट हा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. तुमसर मार्गे हा मार्ग जाणार आहे. यापूर्वी तुमसर-मोहाडी-भंडारा मार्ग खड्डेमय होता. या रस्त्याचा निधी केंद्रीय मार्ग निधीतून मिळाला असून येथे रस्त्याची सुधारणा करून रस्ता रुंदीकरण केले जात आहे. तुमसर शहराला कुबेरनगरी म्हणतात. परंतु हे शहर भकास झाले आहे. जनतेच्या पैशाचा जनतेचे हीत साध्य झाले पाहिजे.यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, रोहा-मुंढरी रस्त्याकरिता जमीन संपादनाकरिता निधी मिळाला असून राज्य शासनाने अंदाजपत्रकात त्याचा समावेश केला आहे. केंद्रीय रस्ते निधी खासदार नाना पटोले यांच्या प्रयत्नामुळे आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अभियंता सावरकर यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर कडव यांनी केले. यावेळी सहाय्यक अभियंता पी.एन. माथुरकर, उपविभागीय अभियंता कोहाळे, संतोष वैद्य, राजकुमार माटे, मिथीलेश झोडे, बालकदास ठवकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करा
By admin | Updated: January 10, 2016 00:36 IST