भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ; बोदरा तलाव फुटल्यानं अनेक मार्ग बंद, घरांमध्ये शिरलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 10:15 AM2020-08-21T10:15:42+5:302020-08-21T10:18:42+5:30

काल दुपारपासून भंडाऱ्यात पावसाचा जोर; अनेक भागांना पावसाचा तडाखा

bodara lake burst after heavy rain many roads closed | भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ; बोदरा तलाव फुटल्यानं अनेक मार्ग बंद, घरांमध्ये शिरलं पाणी

भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ; बोदरा तलाव फुटल्यानं अनेक मार्ग बंद, घरांमध्ये शिरलं पाणी

Next

भंडारा : जिल्ह्यात गुरुवार दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हाहाकार उडाला आहे. नदीनाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. बोदरा येथील तलाव फुटला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जिल्ह्यात गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. या पावसाने तुमसर ते येरली रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे पूल बंद झाला आहे. साकोली येथील एकोडी रोड परिसरातील अनेक घरांमध्ये नवतलावाचे पाणी शिरले आहे. साकोली-तुमसर रस्ता चांदोरी गावाजवळ नाल्याला पूर आल्याने बंद आहे. तसेच साकोली-परसोडी, साकोली-विरसी-सातलवाडा ,साकोली-जमनापुर हे मार्गही बंद आहेत. बोदरा गावातील तलाव फुटला असून जीवितहानी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील मुरमाडी गावातील शिवनगर वॉर्डात पाणी वाढत असून काही घरात पाणी शिरले आहे.

रेंगेपार कोठा गावातील तलाव ओव्हर फ्लो होऊन गावात पाणी शिरत आहे. मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. लाखनी तालुक्याच्या मऱ्हेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे. भंडारा शहरातील अनेक भागातील घरांत पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे.

Web Title: bodara lake burst after heavy rain many roads closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.