लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महापुरानंतर जिल्ह्यात रेती तस्करीने मोठी उचल खाल्ली असून जिल्ह्यातील दहा ते बारा घाटांवर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. जीव धोक्यात घालून रेती उपसणाऱ्या तस्करांपेक्षा अधिकारी-कर्मचारीच मालामाल होत असून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. पवनी, तुमसर तालुक्यात खुलेआम रेती सुरू असून कितीही तक्रार केली तरी तस्करी थांबायचे नाव घेत नसल्याचा अनुभव आहे.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीची रेती विदर्भासह मध्यप्रदेशात प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाच्या रेतीसाठी येथील घाट ओळखले जातात. ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापुरानंतर घाट रेतीने तुडूंब भरले आहे. त्यावर आता तस्करांची नजर गेली आहे. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना खुलेआम रेतीतस्करी होत आहे. पवनी तालुक्यातील गुडेगाव, जुनोना, एनोडा, भोजापूर, तुमसर तालुक्यातील रोहा, बेटाळा, पांजरा आणि भंडारा तालुक्यातील खमारी, कोथूर्ना, बेलगाव घाटावर तस्करांची यात्रा भरली आहे.दररोज शेकडो वाहनातून रात्रीच्यावेळी रेतीची तस्करी होत आहे. हा सर्व प्रकार एवढा बिनबोभाट सुरू असल्याने याला महसूल आणि पोलिसांचे अभय निश्चितच असावे, असा कयास सर्वांना आहे.घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढालीचा अंदाज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात प्रचंड मेहनत आणि धोका रेती तस्करांना आहे. त्यांना यातील मोबदला मिळत असला तरी रेतीचे पाट गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत आणि तेथून वरिष्ठांपर्यंत वाहतात. त्यामुळे शासनाच्या महसुलाला कोट्यवधीचा चुना लागत असला तरी कोणतीच कारवाई होत नाही. घाटाशेजारच्या गावांनी आक्रमक पवित्रा घेतला तर गाव विकासाच्या नावावर पैसे देवून गावपुढाऱ्यांची बोलती बंद केली जाते.रेती तस्करांनी गत १५ दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. नागपूर आणि मध्यप्रदेशात रेती दिवसाढवळ्या पोहचविली जात आहे. यासाठी रेती तस्करांचे मोठे नेटवर्क रस्त्यांवर काम करताना दिसून येते. धाड टाकण्यासाठी कुणी येत असल्यास अवघ्या काही वेळातच त्याची माहिती घाटापर्यंत पोहचते.रेतीचा दर पाच पट वाढलाजिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला असता तर रेतीचे दर गगणाला भीडले नसते. सध्या रेती पाच पट महाग दराने सर्वसामान्यान्यांना घ्यावी लागत आहे. साधारणत: एक ट्रॅक्टर रेतीसाठी सध्या पाच हजार रूपये मोजावे लागतात. मात्र घाटांचा लिलाव झाला असता तर रॉयल्टी आणि वाहतुकीच्या खर्चात हीच रेती दीड हजारात मिळाली असती. तसेच शासनाला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळाला असता. परंतु घाट लिलावाचे भीजत घोंगडे कायम आहे. खनिकर्म विभागही डोळ्याला पट्टी बांधून आहे.
जिल्ह्यात रेती तस्करीत कोट्यवधीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST
घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढालीचा अंदाज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात प्रचंड मेहनत आणि धोका रेती तस्करांना आहे.
जिल्ह्यात रेती तस्करीत कोट्यवधीची उलाढाल
ठळक मुद्देमहसुलाला चुना : तस्करीत अधिकारी-कर्मचारी मालामाल