अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:47+5:302021-05-13T04:35:47+5:30

मुखरु बागडे पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. ...

Akshay is suffering from corona infection | अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

Next

मुखरु बागडे

पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अशा या अक्षय तृतीयेला पितर भोजनासाठी मातीची लाल कळशी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी कुंभार गल्लीत या कळशांची निर्मिती होते. यंदाही शेकडो कळशा कुंभार गल्लीत तयार आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाहेर विकायला न्यायच्या कशा, असा प्रश्न कुंभार गल्लीला पडला आहे. शुक्रवारी अक्षय तृतीया असली तरी अद्यापही कळशा मात्र कुंभारांच्या घरीच आहेत.

पूर्व विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना भोजनदान केले जाते. त्यासाठी लाल रंगाची कळशी महत्त्वाची मानली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासोबतच त्यांना भोजन दिले जाते. या सणाला लाल कळशीला महत्त्व असल्याने प्रत्येक गावातील कुंभार गल्लीत अशा कळशांची निर्मिती सुरू होते. अक्षय तृतीया काही दिवस असली की शहरात विविध ठिकाणी कळशांची रास रचून त्याची विक्री सुरू होते. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी तर मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना संसर्गाने सर्व गणितच बिघडले. पालांदूर येथील उदाराम ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आता घरी कळशा तयार करून आहेत. परंतु, त्या बाजारापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न आहे. तुलाराम ठाकरे, शामराव पाथरे यांनीही आपली व्यथा मांडली. कळशा विकल्याच नाही तर आम्ही कसे दिवस काढणार, असा प्रश्न त्यांनी केला. एकंदरीत अक्षय तृतीया आली तरी कुंभार गल्ली शांत आहे.

संचारबंदीने कुंभार व्यवसायाचे चाक थांबले

गत वर्षभरापासून कोरोना संसर्ग सुरू आहे. सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. गावागावांत असलेल्या कुंभार व्यवसायालाही कोरोनाचा फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी गल्लोगल्लीत माठांची विक्री सुरू असते. त्यासोबतच अक्षय तृतीयेला लागणाऱ्या लाल कळशांची निर्मितीही केली जाते. यावर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मात्र, अनेकांनी मोठ्या आशेने लाल कळशा तयार केल्या. कितीही मोठे संकट असले तरी अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना भोजनदान करावेच लागणार हे माहीत आहे. त्यामुळेच लाल कळशा तयार आहेत. परंतु आता त्या संचारबंदीने शहरापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आता कुंभार गल्ली गाठून कळशा विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात कुंभार व्यवसाय आहे आणि तेथेच या कळशांची निर्मिती होते. परंतु आता तयार केलेल्या संपूर्ण कळशा विकल्या जातील काय? अशी चिंता पालांदूर येथील रेखाबाई पाथरे यांना लागली आहे. अक्षय तृतीयेला कळशा विकल्या गेल्या तरच आमचे काही खरे आहे, असे त्या म्हणाल्या. अशीच अवस्था इतरही समाजबांधवांची आहे.

Web Title: Akshay is suffering from corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.