मालगाडीने चिरडून वरिष्ठ रेल्वे अभियंता जागीच ठार; मेगा ब्लॉक दरम्यान कर्तव्यावर असताना पहाटे घडला अप
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 7, 2024 15:02 IST2024-02-07T15:00:36+5:302024-02-07T15:02:15+5:30
रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता.

मालगाडीने चिरडून वरिष्ठ रेल्वे अभियंता जागीच ठार; मेगा ब्लॉक दरम्यान कर्तव्यावर असताना पहाटे घडला अप
भंडारा : मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक करण्यात होता. या काळात कर्तव्यावर असताना अप मार्गाने जाणाऱ्या मालगाडीखाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी पहाटे ५:१० वाजताच्या दरम्यान घडला. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली. अजयकुमार रघुवंशी (५१) असे मृत रेल्वे अभियंत्याचे नाव आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या कायात तुमसर रोड येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता (रेलपथ) अजय कुमार रघुवंशी हे रेल्वे ट्रॅकवर कर्तव्य बजावत होते. ट्रॅक दुरुस्तीकरिता रेल्वेचे व खाजगी कंत्राटदाराचे सुमारे ७० ते ८० कामगार कार्यरत होते. दरम्यान रघुवंशी हे अपमार्ग ओलांडून पलीकडे सौचाकरिता जात होते. एवढ्यात अपमार्गावरून येणाऱ्या मालगाडीने त्यांना धडक दिली. त्यात चिरडून ते जागीच ठार झाले.
हा प्रकार जवळच काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच एकच धावपळ उडाली. घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून त्यांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
वर्षभरापूर्वीच आले होते बदलून
अजय कुमार रघुवंशी हे यापूर्वी चंद्रपूर येथे कार्यरत होते एक वर्षांपूर्वीच ते तुमसर रोड येथे बदलून आल्यावर रुजू झाले होते. कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावाचे ते सर्वपरिचित होते. त्यांच्या मृत्यूने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.