भंडारा : जिल्ह्यात रेशीम उद्योगाचा अधिकाधिक विकास व्हावा, यासाठी ८० लाभार्थ्यांचे आठ नवीन बचत गट तयार करण्यात आले. या बचत गटांमार्फत यावर्षी ४.५६ लाख टसर कोषाचे उत्पादन करण्यात आले असून त्याची किंमत ८.२० लाख रूपये आहे. यामुळे बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला असून केवळ दोन ते अडीच महिन्यात प्रत्येक बचत गटांना किमान एक लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यात टसर रेशिम उद्योगाला चांगला वाव असल्यामुळे या उद्योगामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठित केली आहे. यामध्ये वनविभागाचे उपवन संरक्षक प्रविणकुमार, रेशिम विकास अधिकारी डॉ. एस.के. शर्मा, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे आणि माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंबोरकर यांचा समावेश आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने देवरी येथील लक्ष्मी बचतगट, सहेली कोसा उत्पादक गट- जामगाव, भावना बचतगट- इंदोरा, इर्वा कोसा उत्पादक गट- इर्वा, बिरसा मुंडा रेशिमगट- किटाळी, राणी दुर्गावती रेशिमगट- किटाळी, विकास रेशिमगट- किटाळी आणि अशोक पाठक सितेपार अशा ८ गटांना १५,२०० अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले. या गटांना प्रशिक्षणासोबतच किटक संगोपन करण्यासाठी रेशिमदुतामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. या बचतगटांनी नोव्हेंबरपासून टसर कोष उत्पादनाला सुरूवात केली. केवळ ६० ते ७५ दिवसात टसर कोष तयार झाले. तयार झालेले टसर कोष महिला आर्थिक विकास गटामार्फत खरेदी करण्यात येणार असून त्यापासून बचतगटामार्फत कापड निर्मितीची प्रक्रिया करण्यात येईल.
आठ लाख रूपयांचे टसर कोष उत्पादन
By admin | Updated: January 10, 2016 00:37 IST