Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:53 IST2022-04-12T15:52:06+5:302022-04-12T15:53:51+5:30
तिन्हीसांज लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याची मान्यता आहे. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या...

Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या
भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये आचार-विचारांना महत्त्व आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहारात काय करावे आणि काय करू नये, याच्या काही मान्यता आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असलेल्या वास्तूशास्त्रात याबाबत काही उल्लेख असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे तिन्हीसांज किंवा दिवेलागण सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची मानली गेली आहे. या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये, असे सांगितले जाते.
सूर्यास्तावेळी म्हणजेच तिन्हीसांजेला सांजवात केली जाते. दररोज कोट्यवधी लोकांच्या घरी देवासमोर दिवे लावले जातात. तिन्हीसांजेला सांजवात करताना तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आजही जोपासली जाते. दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, असे म्हटले जाते. यावेळी लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याचे मानले जाते. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घेऊया...
सायंकाळी स्वच्छता करू नये
घराची स्वच्छता करणे आणि ती राखणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, तिन्हीसांजेला केर काढणे शुभ मानले जात नाही. कारण केरसुणीला लक्ष्मी देवीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या कालावधीत केर काढू नये, असे म्हटले जाते. तिन्हीसांजेच्या पूर्वी केर काढून घ्यावा. अन्यथा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच मानहानी होऊ शकते, असे म्हटले जाते.
आराम चालेल पण झोपू नये
दिवसभराच्या दगदगीनंतर काही जण तिन्हीसांजेला झोपतात किंवा आराम करतात. आराम केला जाऊ शकतो. मात्र, आडवे होऊ नये किंवा झोपू नये, असे सांगितले जाते. ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची आहे, त्यामुळे या वेळी झोपल्याने प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात.
तुळशीची पाने खुडू नयेत
सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर तुळशीची पाने खुडू नयेत, या वेळी तुळशीच्या पानांना स्पर्श करू नये. सायंकाळी किंवा रात्री तुळशीची पाने हवी असल्यास दिवसा काढून घ्यावीत, असे सांगितले जाते. सायंकाळी दारात भिक्षुक आला, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये, असे म्हटले जाते. तसेच तिन्हीसांजेला घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये. ही वेळ लक्ष्मी देवीच्या आगमनाची मानली गेली असल्यामुळे मुख्य दरवाजा खुला ठेवावा. यामुळे लक्ष्मी देवी घरात येऊ शकते, अशी मान्यता आहे. अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊन निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते.