Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवल्या असता होऊ शकते मोठे नुकसान; वाचा वास्तू टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:19 IST2024-01-08T15:19:36+5:302024-01-08T15:19:53+5:30
Vastu Tips: देवघरात देवांव्यतिरिक्त रोजच्या पुजेशी संबंधित अनेक वस्तू ठेवल्या जातात, पण त्यातील कोणत्या गोष्टी त्या परिसरात ठेवू नये हे वास्तू शास्त्रातून जाणून घेऊ.

Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवल्या असता होऊ शकते मोठे नुकसान; वाचा वास्तू टिप्स!
पूर्वी घरं मोठी होती आणि मोठ्या घरात देवघरही मोठे होते. मात्र अलीकडच्या काळात घर लहान त्यामुळे देव्हाराही लहान. परिणामी देव्हाऱ्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणे जिकिरीचे ठरते त्यात महत्त्वाची गोष्ट असते, काडेपेटी. जिच्यामुळे अजाणतेपणी अपघात होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आठवणीने काही गोष्टी करायला हव्यात, त्या पुढीलप्रमाणे.
देवघरात देवाजवळ आपण एक तेलाचा दिवा म्हणजे समई आणि तुपाचा दिवा म्हणजे निरांजन ठेवतो. तसेच देवघर सुवासाने पवित्र व्हावे म्हणून सुगंधी धूप, उदबत्ती लावतो. या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काडेपेटीची गरज लागते. मात्र ती काडेपेटी देव्हाऱ्यात ठेवणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरते.
वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याच्या डोक्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये. जसे की काडेपेटी, वाती, उदबत्ती घर, हळद कुंकवाच्या पुड्या वगैरे. या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे त्या काढ घाल करताना जर पडल्या तर देव्हाऱ्याला नुकसान होऊ शकते. देव्हारा पडू शकतो. देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्ती पडू शकतात. एखादी काचेची वस्तू फुटू शकते. दिव्यावर पडून दिव्याची ज्योत मालवली जाऊ शकते. दिव्याला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदे, चादर किंवा इतर ज्वलनशील वस्तू पेट घेऊ शकतात. म्हणून देव्हाऱ्यात फक्त देव ठेवावेत. देव्हाऱ्याशी संबंधित वस्तूंचे स्वतंत्र छोटेसे कपाट करावे व त्यात सर्व गोष्टी नीट रचून ठेवाव्यात.
अनेकदा विकतच्या देव्हाऱ्याला जोडून छोटेसे खण दिलेले असतात. त्या खणात वस्तू ठेवाव्यात एवढीही जागा नसते. उलट ते खण उघड बंद करताना संपूर्ण देव्हारा गदगदतो. अशातही भिंतीच्या खिळ्यांवर अडकवलेला देव्हारा क्षणात खाली कोसळू शकतो. त्यामुळे तिथेही वस्तू ठेवू नयेत. विशेषतः काडेपेटी, मेणबत्ती ठेवू नये.
देव्हारा खाली अर्थात जमिनीवर असल्यास देवांव्यतिरिक्त अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्यात. अशा ठिकाणी समई न लावता लामण दिवा अर्थात साखळीने लट्कवलेला दिवा लावावा. त्याचा प्रकाश छान पडतो, शिवाय घरात लहान मुलं, पाळीव प्राणी यांचा धक्का लागण्याची भीती राहत नाही. तसेच काडेपेटीसारख्या अपघात घडवू शकणाऱ्या गोष्टी मुलांच्या हाती लागत नाहीत.
देवघरात दिव्यांव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवल्या असता नकारात्मक ऊर्जा घरात वाढीस लागते. आर्थिक बाजू कमकुवत होते तसेच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून काडेपेटी, उदबत्यांचे पाकीट, वातींचे पाकीट देवघराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतर सोडून ठेवावे असे वस्तू शास्त्र सांगते.