Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:24 IST2025-10-13T13:22:34+5:302025-10-13T13:24:28+5:30

Vastu Shastra: 'दिशा बदला, दशा बदलेल' असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते, त्यानुसार कोणत्या दिशेला कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजे, त्याचे महत्त्व आणि लाभ पाहू. 

Vastu Shastra: Kitchen in 'this' direction of the house? It can affect the health of the housewife and family members! | Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!

Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!

>> वास्तुतज्ञ पंडित रमेश पलंगे, सुषमा पलंगे

वास्तु या शब्दाचा अर्थ घर, म्हणजेच आपले राहण्याचे ठिकाण असा आपण साधा सरळ अर्थ लावतो. यावर जो शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो त्याला वास्तुशास्त्र असे म्हणतात ज्याचा आपण आजही वापरत करत आहोत काही कारणाने हे शास्त्र दुर्लक्षित झाले होते परंतु आता ते पुन्हा उदयास आले आहे. आपली वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे असावी असे आजकाल प्रत्येकाला वाटते. तसे हे शास्त्र सोपे नाही. यामध्ये गुढता आहे. तंत्र व विज्ञानाचा परिपूर्ण वापर यामध्ये केला गेला आहे, यावर आपल्या ऋषींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. वेदांमध्ये सुद्धा या शास्त्राचा उल्लेख केला गेला आहे.

जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा प्रथम आपण घराचे दरवाजे व खिडक्या उघडतो, त्यामुळे आपल्या घरात शुद्ध हवा, सूर्यप्रकाश येतो. त्यामुळे आपला उत्साह वाढतो आपल्यात ऊर्जा निर्माण होते मन आणि शरीर प्रसन्न होते. दिवसभर आपण उत्साहात काम करू शकतो. कारण या सूर्यप्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि ही ऊर्जा आपल्याला प्रभावित करत असते. आता ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते तर पूर्वेचे सकाळचे ऊन, अल्ट्राव्हायलेट रेज, डी जीवनसत्वे (अतिनील किरणे) असतात की ज्यातून आपल्याला ऊर्जा तर मिळतेच पण आपल्या शरीराला आवश्यक विटामिन सुद्धा याच उन्हातून मिळते म्हणून वास्तुशास्त्राने पूर्व दिशा मोकळी हलकी आणि या दिशेला थोडा उतारा असावा असे सांगितले आहे जेणेकरून ही ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहील. यातून आपल्या लक्षात आले असेल की वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे. दिशेवर आधारित असे हे दिशा शास्त्र आहे आणि या शास्त्राचा आपण जर योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला, तर आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

पूर्वेकडून येणारे सकाळचे किरण जशी आपल्या आरोग्याला कारक आहेत अगदी त्याच्या विरुद्ध दक्षिणेतून येणारे ताम्र किरण (इन्फ्रारेड रेज) अतिसंहार किरणे ही आपल्या आरोग्याला मारक ठरतात. दुपारनंतर सूर्य दक्षिण दिशेला प्रखर उष्णता निर्माण करतो, त्यामुळे ते आपल्या शरीराला घातक ठरते. त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणून दक्षिण दिशा ही नेहमी बंदिस्त असावी खिडक्या कमीत कमी व प्रवेशद्वार नसावे, असे वास्तुशास्त्राने सांगितलेले आहे. त्याचबरोबर या दिशेला क्षीण करणारी दिशा सुद्धा म्हणतात.

जशी पूर्व दिशा ही उगवतीची दिशा समजली जाते, तशी पश्चिम दिशा ही मावळतीची दिशा समजली जाते. या दिशेतून आपल्याला नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात मिळत असते. व्यवसायाच्या दृष्टीने या दिशेचा विचार केला तर दोन नंबरचे व्यवसाय या दिशेतून चालतात. तसेच शनीचा या दिशेवर अंमल असतो त्यामुळे या दिशेतून धातू संदर्भातले व्यवसाय उत्तम चालतात. स्त्रियांसाठी पश्चिमेचे प्रवेशद्वार लाभदायी ठरते. उत्तर दिशा ही अर्थशास्त्राशी संबंधित अशी ही दिशा आहे. या दिशेला तुमचे प्रवेशद्वार असेल तर तुम्हाला कधीही आर्थिक प्रश्न निर्माण होत नाही. या दिशेवर बुध ग्रहाचा अंमल असतो आणि बुध ग्रह हा व्यापार तत्वाचा असल्यामुळे आपले आर्थिक प्रश्न या दिशेतून सुटतात त्याचबरोबर या दिशेतून लक्ष्मी कुबेराचा प्रवेश होत असतो म्हणून ही दिशा अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या दिशेला प्रवेश द्वार व अधिकाधिक मोकळी जागा असावी.

आजकालची आपली धावपळीची जीवनपद्धत, निसर्गाचे बदलत चाललेले चक्र याचा आपल्या आरोग्यावर अतिशय घातक असा परिणाम होत आहे. अशा वेळी या वास्तुशास्त्राचा योग्य वापर करून घेतला, तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये दिशा शास्त्राला विशेष महत्त्व आहे. निसर्गातून येणाऱ्या वैश्विक ऊर्जा व पंचतत्वाचा जर योग्य पद्धतीने आपल्या वास्तूमध्ये वापर केला तर आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा संतुलित होते. वास्तुशास्त्रामध्ये या पंचतत्वाला अतिशय महत्त्व आहे. पंचतत्व म्हणजे पृथ्वी ,आकाश ,वायू ,जल आणि अग्नी असे हे पंचतत्व आहेत. प्रत्येक दिशेवर या तत्त्वाचा अंमल असतो  जसे  मुख्य दिशांचा विचार केला तसा आपल्या वास्तूमध्ये चार उपदिशा असतात. यामध्ये ईशान्य दिशेला जलतत्त्व ,आग्नेय  दिशेला अग्नी तत्व, नैऋत्य  दिशेला पृथ्वीतत्व, वायव्य या दिशेला वायुतत्व आणि ब्रह्मस्थान म्हणजेच आकाश तत्व असे हे तत्व प्रत्येक दिशेला असतात आणि त्या तत्त्वांचा त्या दिशेवर परीणाम होत असतो, त्या प्रमाणे वास्तुशास्त्राने घराची रचना या तत्त्वाप्रमाणे आणि दिशेनुसार केली आहे.

दिशांचे महत्त्व : 

ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा मानली जाते. सर्वाधिक पवित्र आणि ऊर्जा देणारी अशी ही दिशा. या दिशेला देवांचे वास्तव्य असते, म्हणून आपल्या वास्तू मधील मंदिराचे स्थान हे ईशान्य दिशेला असावे. अध्यात्म ,ध्यानधारणा तसेच आपली बौद्धिक शैक्षणिक वाढ या दिशेतूनच होत असते. जलतत्त्वाची ही दिशा आहे. वास्तुपुरुषाच्या रचनेचा विचार केला तर त्याच्या डोक्याचा { बुद्धिचा} भाग या दिशेला असतो म्हणून या दिशेला कोणत्याही प्रकारचा दोष असू नये. ही दिशा नेहमी स्वच्छ, मोकळी आणि  या दिशेला प्रवेशद्वार व खिडक्यांची रचना असावी.

अग्नेय दिशा स्त्री तत्त्वाची आहे. या दिशेला आपल्या किचनची रचना असावी या दिशेमध्ये जर दोष निर्माण झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा त्या घरातील स्त्रियांवर होतो  स्त्रियांच्या आजाराचे प्रमाण वाढते घरामध्ये सदस्यांच्या पोटांचे विकार आणि आर्थिक चणचण भासत असते. कारण ही ऊर्जा देणारी दिशा आहे म्हणून या दिशेला किचनची रचना असावी या दिशेला चुकूनही पाणी अथवा टॉयलेट बाथरूमची रचना असू नये. स्वयंपाक करताना तोंड नेहमी पूर्वेला असावे पूर्व दिशेच्या भिंतीवर खिडक्यांची रचना असावी जेणेकरून त्यातून येणार उन्हामुळे  आपली वास्तू ही निर्जंतुक होत असते आणि किचन मधील वातावरण हे शुद्ध व प्रसन्न राहते. 

नैऋत्य दिशेवर राहू केतू सारख्या अशुभग्रहांचा अधिक प्रभाव असतो परंतु तरीही ही दिशा आपल्याला स्थिर तत्व प्राप्त करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. या दिशेला पृथ्वीतत्व आहे. वास्तुपुरुषाच्या पायाचा भाग या दिशेमध्ये येतो आपल्याला स्थिरता प्राप्त करून देणारी अशी ही दिशा आहे म्हणून घरातील गृहप्रमुखाचे मुख्य शयनगृह या दिशेला असावे. तसेच ही दिशा इतर देशांपेक्षा सर्वाधिक जड असावी. या दिशेला तुम्ही जिन्याची रचना सुद्धा करू शकता. कुटुंबप्रमुखाला सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक स्थिरता प्राप्त करून त्याचा आपल्या व्यवसायावर व कुटुंबावर दबाव राहण्यासाठी ही दिशा अत्यंत महत्त्वाची असते.

मुलांची शैक्षणिक बौद्धिक वाढ होण्यासाठी त्यांना व्यवसायाच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वायव्य दिशा ही महत्त्वाचे काम करते. वायव्य दिशेला नेहमी मुलांचे बेडरूम असावे उपवर मुला मुलींचे लग्न होण्यासाठी मुलांना परदेशी शिक्षण परदेशी नोकरी अथवा प्रमोशन मिळवण्यासाठी ही दिशा महत्त्वाची असते. या दिशेला पाहुण्यांचे बेडरूम असावे त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने ही दिशा प्रगती व व्यवसायाला गती प्राप्त करून देणारी त्यामुळे या दिशेला व्यवसायाचे प्रवेशद्वार असले तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात.  
 
वास्तूचे ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळे वजन विरहित असावे  कारण आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो त्या वास्तुपुरुषाचे ब्रह्मस्थान हे नाभिस्थान असते म्हणूनच ब्रह्मस्थान मोकळे व वजन विरहित रचना असावी जेणेकरून आपल्या घरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा या ब्रह्मस्थान म्हणजेच आकाश तत्वामध्ये साठवली जाते आणि  आपल्या संपूर्ण वास्तूला सकारात्मक ऊर्जा मिळत असते. 

वास्तूशास्त्राचे लाभ : 

अशा पद्धतीने वास्तुशास्त्र हे  दिशेवर आधारित असे शास्त्र आहे. याप्रमाणे जर आपण त्याचा उपयोग करून घेतला तर आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक एनर्जी येऊन आपल्याला सुख, समाधान शांतता मिळू शकते. तर वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधल्यास आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. आपण नेहमीच म्हणत असतो दिशा बदली की दशा बदलते. म्हणूनच इथे दिशेला अतिशय महत्त्व आहे. आता आपल्या शरीराच्या रचनेचा विचार केला तर जशी माणसाच्या शरीराची रचना असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये वास्तू पुरुषाच्या शरीराची रचना असते. नैसर्गिक रित्या माणसाच्या शरीराची रचना ठरलेली असते. डोळे, नाक, कान, घसा हात, पाय, वगैरे वगैरे त्याप्रमाणे प्रत्येक अवयव आपले कार्य करत असतो. पण आपल्या शरीरातील एखादा भाग नसेल तर आपले कार्य थांबते अथवा आपल्याला त्याचा मानसिक अथवा शारीरिक त्रास होतो आपण त्याला अपंगत्व असे नाव देतो तो माणूस मानसिक दृष्ट्या दुर्बल होतो. त्याचा आत्मविश्वास कमी होतो अगदी तसेच कार्य वास्तूमध्ये वास्तुपुरुषाचे असते. नैसर्गिक रित्या दिशेंचा अभ्यास केला तर पंचतत्व प्रमाणे नऊ दिशा आपल्या वास्तूमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणे काम करतात पण जर आपल्या वास्तू मधील एखादा भाग कट झाला तर ती वास्तू अपंग होते. त्या दिशेचा फायदा आपल्याला मिळत नाही मात्र त्याचे दोष आपल्या वास्तूमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच वास्तु नेहमी चौकोन अथवा आयताकृती असावी. वास्तूला कोणत्याही दिशेला  कट असू नये. 

आता आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करावे लागतात. वास्तु म्हणते तथास्तु असे आपण नेहमीच ऐकत असतो. यासाठी वास्तूमध्ये आपल्याला काही नियम पाळावे लागतात. घरामध्ये पती-पत्नीमध्ये एक वाक्यता असावी. एक विचार असावा. मुलांचे पालकांबरोबर नियमित सुसंवाद असावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी अपशब्दाचा वापर कधीही करू नये. आपली संस्कृती जपावी. नित्य नियमाने आपल्या परंपरेप्रमाणे देवपूजा करावी. तेलाचा तुपाचा दिवा लावावा. सुगंधी धूप लावावे. घंटानाद करावा. दाराची चौकट नेहमी लाकडीच असावी. उंबरासुद्धा लाकडीच असावा. उंबऱ्याची नियमित पूजा करावी. दारात तुळशीचे रोप असावे तिन्ही सांजेला दिवाबत्ती करावी. 

वास्तू नियम : 

मंत्रपठण ऐकावे, अथवा म्हणावे. घर नेहमी सुटसुटीत, स्वच्छ, सुंदर असावे.  
उत्तम प्रकाश योजना असावी. घरामध्ये इतकेच फर्निचर असावे, की जेणेकरून आपल्या घरामधील हवा मोकळी खेळती असावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. 
दिशेप्रमाणे दारा खिडक्यांची रचना करावी. 
दरवाजे खिडक्या मधून कधीही करकर असा आवाज येऊ नये. 
मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ सुंदर व सुशोभित असावे. पारा गेलेला अर्धवट फुटलेला आरसा घरात कधीही ठेवू नये. 
बंद पडलेली उपकरणे, घड्याळे  ठेवू नये. 
रंगांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करावा अति भडक रंगांचा कधीही वापर करू नये. 
तत्वाप्रमाणे, दिशेप्रमाणे  रंगांचा वापर करावा. 

या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या नियमांचे पालन केले, तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर लक्ष्मीचा वास राहतो. ज्या घरात माणसांमध्ये सुसंवाद असतो, एकमेकांची ओढ असते, पाहुण्यांचा पाहुणचार मोठ्यांचा मानसन्मान केला जातो, दानधर्माला महत्त्व दिलं जातं त्याच घराची भरभराट होते. हेच तुमचं खरं वास्तुशास्त्र होईल आणि हीच आपली संस्कृती संस्कार व शास्त्र आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये  या प्रत्येक गोष्टीला  महत्त्व दिलेला आहे आणि म्हणून या शास्त्राचा योग्य पद्धतीने अभ्यासपूर्वक वापर व मार्गदर्शन घेतले पाहिजे तरच तुम्ही म्हणू शकता. 

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको नुसती नाती

Web Title : वास्तु शास्त्र: रसोई की दिशा से सेहत और परिवार पर असर

Web Summary : वास्तु शास्त्र स्वास्थ्य और समृद्धि के लिए दिशाओं के महत्व पर जोर देता है। पूर्व सकारात्मक ऊर्जा लाता है, जबकि दक्षिण हानिकारक हो सकता है। रसोई का स्थान महिलाओं के स्वास्थ्य को प्रभावित करता है। संतुलन बनाए रखें।

Web Title : Vastu Shastra: Kitchen direction impacts health, family well-being, says expert.

Web Summary : Vastu Shastra emphasizes directional importance for health and prosperity. East brings positive energy, while South can be detrimental. Kitchen placement affects women's health. Balance elements for well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.