संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 23:02 IST2025-05-15T22:55:53+5:302025-05-15T23:02:09+5:30
Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय कधी आहे? सोप्या पद्धतीने व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या...

संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
Vaishakh Sankashti Chaturthi May 2025 Vrat Puja Vidhi: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, दुसरा वैशाख महिना सुरू आहे. मराठी नववर्षातील दुसरी संकष्ट चतुर्थी साजरी होत आहे. काही मान्यतांनुसार, वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या व्रतात गणपतीच्या एकदंत स्वरुपाचे पूजन केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मे महिन्यातील वैशाख संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ, व्रतपूजनाचा सोपा विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया...
वैशाख संकष्ट चतुर्थीला वरिष्ठ आणि मालव्य राजयोग यांसारखे काही अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात.
वैशाख संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, १६ मे २०२५
वैशाख संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ०३ मिनिटे.
वैशाख संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, १७ मे २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून १३ मिनिटे.
संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते.
वैशाख संकष्ट चतुर्थी व्रत पूजन कसे करावे?
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ १० वाजून २९ मिनिटे |
ठाणे | रात्रौ १० वाजून २८ मिनिटे |
पुणे | रात्रौ १० वाजून २३ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ १० वाजून २२ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ १० वाजून १७ मिनिटे |
सातारा | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
नाशिक | रात्रौ १० वाजून २७ मिनिटे |
अहिल्यानगर | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
धुळे | रात्रौ १० वाजून २५ मिनिटे |
जळगाव | रात्रौ १० वाजून २२ मिनिटे |
वर्धा | रात्रौ १० वाजून ०९ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ १० वाजून १० मिनिटे |
बीड | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
सांगली | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ १० वाजून १७ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ १० वाजून १३ मिनिटे |
नागपूर | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
अमरावती | रात्रौ १० वाजून १३ मिनिटे |
अकोला | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ १० वाजता २२ मिनिटे |
परभणी | रात्रौ १० वाजून १३ मिनिटे |
नांदेड | रात्रौ १० वाजून १० मिनिटे |
धाराशीव | रात्रौ १० वाजून १३ मिनिटे |
भंडारा | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ १० वाजून ०४ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
मालवण | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
पणजी | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
इंदौर | रात्रौ १० वाजून २६ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ १० वाजून २६ मिनिटे |
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||