तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 15:58 IST2025-08-10T15:51:22+5:302025-08-10T15:58:03+5:30

Third Shravan Somwar 2025: श्रावण महिन्यात शेवटचे दोन सोमवार राहिले असून, शिवपूजनाला वाहायची शिवामूठ, मान्यता जाणून घ्या...

third shravan somwar 2025 how do shivpujan and which shivamuth of offer and know about vrat vidhi significance in marathi | तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

Third Shravan Somwar 2025: मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. महादेव शिवशंकरांच्या पूजनासाठी श्रावण सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावण महिन्यातील शेवटचे दोन सोमवार आहेत. तिसरा श्रावण सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. या दिवशी कोणती शिवामूठ वाहावी, शिवपूजन कसे करावे? जाणून घेऊया...

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी?

श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. 

तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवपूजन करण्याची सोपी पद्धत

श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. षोडषोपचार पूजन शक्य नसेल, तर पंचोपचार पूजन करावे. आपापल्या परंपरा, कुळाचार, कुळधर्म पाळून शिवपूजन करावे, असे सांगितले जात आहे. 

तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणा प्रभावी शिवमंत्र

तिसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी किंवा तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते.  'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

Web Title: third shravan somwar 2025 how do shivpujan and which shivamuth of offer and know about vrat vidhi significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.