Tarot Card: येत्या आठवड्यात जीव ओतून काम करण्याशिवाय पर्याय नाही; टॅरो कार्ड सांगतेय तुमचे साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 14:14 IST2023-11-18T14:14:32+5:302023-11-18T14:14:51+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या तीनापैकी एक कार्ड निवडून आपल्याला भविष्य जाणून घेता येते; तुम्हीही एक कार्ड निवडून बघा...

Tarot Card: येत्या आठवड्यात जीव ओतून काम करण्याशिवाय पर्याय नाही; टॅरो कार्ड सांगतेय तुमचे साप्ताहिक भविष्य!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
19 ते 25 नोव्हेंबर
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन पर्याय, नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट आणि खऱ्या संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये किंवा घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीने काम करण्याची गरज आहे. भावना किंवा भौतिक वस्तुंपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी पर्यायापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता, विशेष करून संभाषण क्षेत्रात. वेळ वाया घालवू नका. लोकांशी तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे निसंकोचपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान मिळणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कंटाळा येऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड वाटणारं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल, तसं करण्याची इच्छा होईल.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेलं काहीतरी एकदाचं सोडून द्या. कुठेही खूप गुंतू नका. ध्यान, उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक जडणघडणीचा असणार आहे. कुठलं तरी ध्येय गाठण्यासाठी धडपड कराल. इतरांच्या मदतीने निश्चितंच एक टप्पा गाठला जाईल. सक्षम आणि स्थिर वाटेल. प्रयत्नांना यश येईल. तुम्ही केलेल्या कामाला ओळख मिळेल. घर, जमीन, गाडी, नोकरी, व्यवसाय किंवा इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये चांगली प्रगती होईल, संपन्नता राहील.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात संपूर्ण लक्ष देऊन, जीव ओतून आणि भरपूर कष्ट करून पुढे वाढण्याची गरज आहे. कामामध्ये परिपूर्णता आणायचा प्रयत्न करा. चुका दुरुस्त करा. इतरांच्या मदतीने, सोबतीने पुढे चाला. कोणीतरी दिलेल्या सूचना अंमलात आणा. इतरांना तुम्ही देखील मदत करा. एखाद्या क्षेत्रात नवीन कौशल्य शिका. एकट्या पेक्षा मिळून मिसळून काम करा.
श्रीस्वामी समर्थ.