Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:05 IST2021-08-14T16:05:20+5:302021-08-14T16:05:40+5:30
Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे.

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!
चांगल्या-वाईट परिणामाचा अंदाज घेऊन केलेला विचार त्याला आपण सारासार विचार म्हणतो. हा विचार करण्याची क्षमता असलेली ग्रंथी आपल्या मेंदूजवळ असते. ती आपल्याला योग्य-अयोग्य विचारांचे मार्गदर्शन करते. आपण कधी तिचे ऐकतो, तर कधी ऐकत नाही. त्या ग्रंथींवरील तोल सुटला, की आपल्याला राग येतो, रागाच्या भरात आपण काहीबाही बोलतो आणि वागायला नको, तशी कृती करून बसतो. म्हणून त्या ग्रंथीवर नियंत्रण आवश्यक असते. तिलाच शिव ग्रंथी असेही नाव आहे.
भगवान शिव ज्याप्रमाणे सृष्टीवरील वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात, त्यानुसार ही ग्रंथी देखील आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवत असते. अशा दृष्टीने तिचे नाव सार्थ वाटते. परंतु त्या ग्रंथीवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर संयम हवा. हा संयम उपासाने आणि उपासननेनेच साध्य होऊ शकतो.
श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे. उपासाच्या दिवशी देहाचीच नाही, तर मनाची शुद्धताही तेवढची महत्त्वाची असते. यासाठी उपासाला नियमांची जोड दिली आहे. उपासाच्या दिवशी केवळ फलाहार करावा, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, शरीरसंबंध ठेवू नये. हा देहाचा आणि मनाचा उपास आहे.
सोळा सोमवारच्या व्रतात खंड पडला, तर पुन्हा नव्याने एक पासून सोळा सोमवार करावे लागतात. ही संयमाची परीक्षा असते आणि संयम वाढवणारी उपासना असते. त्यावर नियंत्रण मिळवले, तर शिवग्रंथी आटोक्यात राहते आणि मन स्थिर होऊन उपासनेला बळ मिळते.
भगवान महादेवांनी जसा कामासूरावर विजय मिळवला होता, त्याप्रमाणे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणात ही व्रते आयोजली आहेत. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासातून, उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे आपल्या आयुष्यात अविभाज्य स्थान आहे. परंतु त्यांचे प्रमाण आखून दिलेले आहे. हे रस मर्यादित प्रमाणात असले, तरच जीवन सुसह्य होईल, अथवा जीवन नरक बनेल. त्यांच्यावर संयम मिळवायचा असेल, तर अशा व्रत-वैकल्यांचे पालन अवश्य करायला हवे. तसेच श्रावण संपल्यावरही आठवड्यातून एकदा देहाचा आणि मनाचा उपास घडवणारे हे व्रत आजीवन पाळायला हवे.