श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:13 IST2025-08-11T11:09:40+5:302025-08-11T11:13:22+5:30
Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय अवश्य करावेत? जाणून घ्या...

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून, अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. या दिवशी केलेल्या गणपती पूजन, उपासना, नामस्मरण यांचे शुभ पुण्य मिळून अनेक पटींनी लाभ होतात, असे मानले जाते. विशेष अंगारक संकष्ट चतुर्थीला काही उपाय करणे अतिशय चांगले मानले गेले आहे.
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
श्रावण संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की, सर्वांनाच वेध लागतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत येते. त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्य साधारण मानले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय अवश्य करावेत?
आपण गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करत असलो तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न केले जातात, कठोर परिश्रम, मेहनत केली जाते; परंतु, त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे, असा सल्ला दिला जातो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते, असे सांगितले जाते. श्रावणातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग आल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले असून, हे उपाय फलद्रूप होण्यास मदत मिळू शकते, असे म्हटले जाते.
- गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत.
- यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला ११ दुर्वांच्या ११ जुड्या अर्पण कराव्यात. २१ जुड्या अर्पण केल्या तर उत्तम.
- गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे.
- परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे.
- गणपती संकटनाशनम् स्तोत्र म्हणावे. ‘ॐ गं गणपतये नम:’ किंवा ‘ॐ सिद्धिविनायकाय नम:’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
- श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते. श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे. याने शिवशंकर आणि गपणती बाप्पा दोघांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात.
- राहु-केतुसह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितले असल्यास ‘ॐ दुर्मुखाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥