Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 07:05 IST2025-07-19T07:00:00+5:302025-07-19T07:05:01+5:30

Shravan 2025: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास!

Shravan 2025: Shravan is coming, on this occasion, let's get to know the ancient Shiva temple in Nagpur! | Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

>> सर्वेश फडणवीस

भारतात शिव या देवतेचे असंख्य भक्त आहेत. किंबहुना इतर कोणत्याही देवतेपेक्षा शिव हा अधिक लोकप्रिय आहे. शिवपुराण, लिंगपुराण, अग्निपुराण यांतून याच्याबद्दल अधिक माहिती आढळते. शिवाच्या कितीतरी लीलांवर आधारित हजारो मूर्ती घडविल्या गेल्या. आपण ज्या शहरात राहतो त्याठिकाणी सुद्धा पावलापावलावर महादेव मंदिर हे जवळपास बघायला मिळतेच. नागपुरातील प्राचीन मंदिरांबद्दल जाणून घेताना आजही नवनवीन माहिती मिळते. भोसलेकाळीं बांधलेली ही मंदिरे काही प्रमाणात चांगल्या स्थितीत बघायला मिळतात. काही अजूनही चांगल्या स्थितीत नाही. असे असले तरी त्यांचा योग्य परिचय आणि प्रयोजन यासंबंधीची जाण अनेकांना व्हावी म्हणून या माध्यमातून अशा प्राचीन शिवालयाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला. 

देगलूरकर सर एके ठिकाणी लिहितात, शिवाचे आख्यान लावले तर लक्षात येते की, याच्या व्यक्तिमत्त्वात बराच विरोधाभास आहे. अमंगल आणि मंगल, तसेच, रौद्र आणि सौम्य, सर्व संहारक (महाकाल) आणि सुखनिधान (सदाशिव), भयंकर असा तो आहे. ब्रह्मा सृष्टिनिर्माता, विष्णू सृष्टिपोषक तर शिव संहार करणारा म्हणून सर्वज्ञात आहेत. शिव संहारक आहे तरी लगेच नवसर्जन घडवून आणणाराही आहे. म्हणजेच तो सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. म्हणूनच त्याला बीजी म्हटले आहे. शिवाची उपासना करणारा समाज, विष्णू आणि इतर देवतांच्या उपासकांपेक्षा, संख्येने खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे वैदिकात त्याचा समावेश बऱ्याच उशिराचा आहे, प्रारंभी तर तोही विरोधाला तोंड देतच आला आहे. त्याची अनेक रूपे आहेत, अनेक नावे आहेत, तसेच त्याच्या परिवारात कोणाची गणना होते, त्याचे कार्यकर्तृत्त्व काय इत्यादी बाबींचा परिचय त्याच्या नावातूनच होतो. 

भारतात लिंगपूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासूनचे आहे. आणि विशेष म्हणजे ते आजतागायत चालू आहे. इतर कोणत्याही देवतापूजेपेक्षा ते अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे. विविध प्रकारच्या शिवलिंगांचा विग्रह आपल्याला अनेक शिवालयात गेल्यावर सहज नजरेत भरतो. असेच एक प्राचीन शिवालय नागपूर शहराच्या मध्यभागी सीताबर्डी भागात बघायला मिळतो. हेच ते धर्ममूर्ती ताराबाई बुटी महादेव मंदिर. 

श्री बुटींचे शिवमंदिर किंवा बुटी महादेव मंदिर या नावाने हे शिवालय ओळखल्या जाते. आज शहराच्या मध्यभागी असलेले महादेव मंदिर आता जीर्ण झाले आहे. याबद्दल अशी माहिती सांगितली जाते की भोसल्यांच्या दरबारी असलेले पू. रामचंद्र बुटी महाराज हे शिवोपासक होते आणि कालांतराने साधनेकरीता गिरनार क्षेत्री निघुन गेले. यांच्याच काळात मंदिराची स्थापना झाली. पुढे धर्ममूर्ती ताराबाई बुटी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरातील सभामंडप आणि शिवलिंग आजही बघायला मिळतो. निवृत्ती-ज्ञानराजांपासून चालत आलेल्या नाथ परंपरेतील पू. रामचंद्र म. महाराज बुटी यांची समाधी पण याच परिसरात (मागच्या बाजुला) आहे. हा सर्व परिसर अर्थात ही वास्तु बुटी वंशजाकडे आहे, त्यामुळे त्यांच्या परवानगीने आपण ही संपूर्ण वास्तू बघू शकतो. नागपुरातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. दादाबुवा देवरस यांनी या मंदिरात त्यांचे गुरू थोरलेस्वामी वासुदेवानंदसरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांचा समाराधना दिन उत्सव याच बुटी मंदिरात सुरू केला आणि गेली अनेक वर्षे झाली आजही हा उत्सव नियमित सुरू आहे. आज या उत्सवाच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांची वर्दळ असते. आवर्जून एकदा तरी दर्शनासाठी जावे असेच हे बुटी महादेव मंदिर आहे. 

Web Title: Shravan 2025: Shravan is coming, on this occasion, let's get to know the ancient Shiva temple in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.