पंढरपूरच्या विठुरायाचे रूप आपण नेहमी दोन्ही हात कमरेवर असलेल्या स्वरूपात पाहतो. मात्र, पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या देवघरात अशा एका पांडुरंगाचे वास्तव्य आहे, ज्याचा एक हात कमरेवर आहे तर दुसरा हात लोणी चाखण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. या मूर्तीला 'विजयी पांडुरंग' का म्हणतात आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया.
राजाचा राजवाडा सोडून नाथांच्या झोपडीत आलेला 'विठ्ठल'
या मूर्तीचा इतिहास कर्नाटकातील विजयनगरचा राजा रामदेवराय यांच्याशी जोडलेला आहे. राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ओढीने दीड फूट उंचीची, पंचधातूंची एक अत्यंत देखणी मूर्ती बनवून घेतली. राजाची इच्छा होती की या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या राज्यात व्हावी.
परंतु, प्रत्यक्ष भगवंताने राजाला दृष्टांत दिला— "मी तुझ्या राजवाड्यात राहणार नाही. ही मूर्ती तू पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे, अन्यथा तुझा निर्वंश होईल." भगवंताच्या इच्छेखातर राजाने ती मूर्ती वाजत-गाजत पैठणला आणली.
मूर्तीचा हात कमरेवर का नाही?
जेव्हा राजा ही मूर्ती घेऊन पैठणला पोहोचला, तेव्हा नाथ महाराज 'पुराण खांबाला' टेकून प्रवचन देत होते. नाथांनी भगवंताला पाहिले आणि मनोभावे नमस्कार केला. पण नाथांनी एक प्रश्न विचारला, "देवा, तू राजाचा विठ्ठल, तुला पंचपक्वान्नांची सवय. माझ्या गरिबाच्या घरी तुला जेवायला काय मिळणार?"
या प्रश्नाचे उत्तर विठ्ठलाने विटेवर अक्षरे उमटवून दिले— "दास जेवू घाला न.. घाला" (मी तुझा दास म्हणून आलो आहे, तू जेऊ घाल किंवा नको घाल, मी तुझ्याच कडे राहणार).
त्यावेळी नाथांच्या पत्नी गिरीजाबाईंनी भगवंताचा पाहुणचार म्हणून चांदीच्या वाटीत लोणी-खडीसाखर आणले. ते लोणी घेण्यासाठी भगवंताने आपला उजवा हात कमरेवरून पुढे केला आणि लोणी चाखले. तो हात लोणचट (लोणी लागलेला) असल्याने, भगवंताने तो पुन्हा व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही. म्हणूनच या मूर्तीचा उजवा हात कमरेच्या खाली असून तळवा समोरच्या बाजूला उघडलेला दिसतो.
विजयी पांडुरंगाची ३ अद्भूत वैशिष्ट्ये:
१. विटेवरील अक्षरे: या मूर्तीच्या पायाखालच्या विटेवर आजही "दास जेवू घाला न.. घाला" ही अक्षरे अस्पष्ट रूपात पाहायला मिळतात. २. लोण्याचा चिकटपणा: आजही प्रत्येक एकादशीला जेव्हा मूर्तीला अभिषेक घातला जातो आणि पिठीसाखरेने स्वच्छ केले जाते, तेव्हा त्या उजव्या हातावरून हात फिरवल्यास लोण्याचा नैसर्गिक चिकटपणा जाणवतो, असे भाविक सांगतात. ३. खांद्यावरील घट्टे: प्रत्यक्ष विठ्ठलाने 'श्रीखंड्या' बनून नाथांच्या घरी १२ वर्षे कावडीने पाणी वाहिले होते. त्या पाणी वाहिल्यामुळे मूर्तीच्या खांद्यावर पडलेले घट्टे (खुणा) आजही स्पष्ट दिसतात.
Web Summary : Paithan's Vitthal idol, unlike Pandharpur's, has one hand extended for butter. King Ramdevraya gifted it, following a divine vision. The idol bears marks of Krishna's presence, including butter residue and shoulder calluses from carrying water.
Web Summary : पंढरपुर के विपरीत, पैठण के विट्ठल की मूर्ति का एक हाथ मक्खन के लिए आगे बढ़ा हुआ है। राजा रामदेवराय ने दिव्य दृष्टि के बाद इसे भेंट किया। मूर्ति में कृष्ण की उपस्थिति के निशान हैं, जिनमें मक्खन का अवशेष और पानी ढोने से कंधे पर गांठें शामिल हैं।