Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:00 AM2024-01-18T07:00:00+5:302024-01-18T07:00:01+5:30

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो, त्याला या प्रभावी स्तोत्राची जोड देऊया.

Shakambhari Navratri 2024: Let's celebrate Shakambhari by learning the meaning of Mahishasur Mardini Stotra nine days from today! | Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया!

Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया!

>> रवींद्र गाडगीळ 

महिषासुर मर्दीनी स्तोत्र ही पद्य पुष्पांजली संस्कृतात आहे. ऐकायला इतकी गोड आहे की तुम्ही गुणगुणायला लागता सुद्धा. कारण ह्यात जे यमक अलंकार आहेत ते एकच शब्द चार चारदा आले आहेत. परंतु गंमत म्हणजे त्या चारी शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांच्या प्रत्येक रचनेत हे आपल्याला दिसून येईल. तसेच ह्या पुष्पांजलिचे रचयिते नेमके सांगता येणार नाही. परंतु शब्दरचना मात्र शंकरचार्यांशी जवळीक दाखवते. नवरात्रीत आपण देवीची विविध प्रकारे पुजा करीत असतो, त्यातलीच ही एक तालासुरावर भजनसेवा!!

अयि गिरी नंदिनी, नंदित मेदिनि, विश्व विनोदिनी नन्द्नुते, 
गिरीवर विंध्यशिरोधिनि वासिनि, विष्णु विलासिनि जिष्णुनुते | 
भगवती हे शितिकंठ कुटुंबिनि, भूरि कुटुंबिनि भुरिकृते, 
जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||१||

पर्वतांचा राजा जो हिमालय त्याची कन्या, संसारातल्या प्रत्येक जीवाला आनंदित करणारी देवी, आणि विश्वाला विनोद घडवून त्यांच्या मुखावर कायम हास्य निर्माण करणारी. नंदी वगैरे जे गण आसपास आहेत त्यांच्याकडून सन्मानित. विंध्य पर्वतावरच्या सर्वोच्च शिखरावर निवास करणारी तू, विष्णुंवर प्रसन्न होणारी,  देवेंद्राकडून पूजित, नीलकंठाची धर्मपत्नी, सकल विश्वाचा हा अवाढव्य व्याप सहज सांभाळणारी, अखिल विश्वाला कायम संपन्नता देणारी, मदोन्मत्त महिषासुराचा वध करून प्रसिद्ध पावलेली तू, आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

सुरवरवर्षिणि दुर्धरघर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते, 
त्रिभुवनपोषिणी शंकरतोषिणी किल्विषमोषिणी घोषरते | 
दनुज निरोषीणी दितिसुतरोषीणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||२||

सुरवरांना सुद्धा इच्छित वर देणारी, दुर्धर व दुर्मुख अशा दुष्ट राक्षसांचा संहार करणारी, निंदा करणार्‍याप्रती दयाळूपणे क्षमाशील असणारी, कायम प्रसन्न मुद्रा ठेऊन वावरणारी, त्रैलोक्याची पालनकर्ती, शिवाला संतोष देणारी, पापांना दूर लोटणारी, वाईट कृत्यांपासून वाचवणारी, दानवांवर सदा क्रोधित होणारी, अहंकारी लोकांचा भ्रमनिरास करणारी, सागर कन्या जी शिवावर अनुरक्त असते, हे महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

अयि जगदंब मदंब कदंबवनप्रियवासिनी हासरते, 
शिखरशिरोमणि तुंगहिमालय शृंगनिजालय मध्यगते, 
मधुमधुरे मधुकैटभ भंजिनी कैटभगंजिनी रासरते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते ||३||

ह्या त्रैलोक्याची माता, माझे आई, कदंबच्या घनदाट वनात विहार करणारी, हसतमुख, हिमालयाच्या प्रांगणात वावरणारी, गोड हवाहवासा स्वभाव असलेली, मधु व कैटभ अशा महाकाय दुष्ट राक्षसांचा संहार करणारी, कैटभाचा गर्वहरण करणारी, रासक्रीडा खेळणारी, हे महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो.

माता शाकंभारी,आपल्या सर्वांवर कृपावंत होवो. हा करोंनासुर विश्वातून निघून जावो. पुढील श्लोकांसह उद्या भेटूच. 

Web Title: Shakambhari Navratri 2024: Let's celebrate Shakambhari by learning the meaning of Mahishasur Mardini Stotra nine days from today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.