शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:06 IST2025-10-09T11:03:38+5:302025-10-09T11:06:58+5:30
Sankashti Chaturthi October 2025: शुक्रवारी संकष्ट चतुर्थी असल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीचे पूजन शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते.

शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
Sankashti Chaturthi October 2025: शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास समाप्त होत असल्यामुळे अश्विन संकष्ट चतुर्थी ही चातुर्मास काळातील शेवटची संकष्ट चतुर्थी मानली जात आहे. शुक्रवार हा दिवस देवीसाठी समर्पित असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पासह लक्ष्मी देवीचीही मनोभावे पूजन केल्यास उत्तम शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. कुणीही संकष्ट चतुर्थीचे व्रत करू शकतो. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.
संकष्ट चतुर्थीला गणपती पूजनात चंद्रोदय महत्त्वाचा
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.
शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला गणपतीसह लक्ष्मी पूजन करा
गणपती पूजन करण्यासह लक्ष्मी देवीचे पूजनही करावे. षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने लक्ष्मी पूजन करावे. लक्ष्मी देवीची संबंधित तसेच लक्ष्मी देवीच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णुसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशीसमोर दिवा लावावा. देवीशी संबंधित मंत्रांचे जप करावेत. स्तोत्र म्हणावे. अगदीच काही शक्य नसेल, तरी 'ॐ महालक्ष्म्यै नम:' या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥