Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:46 IST2025-10-11T13:45:27+5:302025-10-11T13:46:13+5:30
Premanand Maharaj Health Update: दोन दिवसांपूर्वी प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ आणि त्यांची ढासळलेली तब्येत पाहून भाविक चिंताग्रस्त झाले होते, अशातच महाराजांनी हे मोठे विधान केले...

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण...
Premanand Maharaj Health Update: आजच्या तंत्रयुगात मनोरंजनाच्या माध्यमांचा, जाहिरातींचा जनमानसावर एवढा मोठा पगडा असूनही काही अध्यात्मिक गुरु सोशल मीडियाद्वारे लोकांना अध्यात्मिक मार्गावर नेत आहेत. वीस सेकंदाचे शॉर्ट्स, १-२ मिनिटांचा व्हिडीओ ऐकून लोक आपल्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यात समाधान मानत आहेत. त्यातच एक आहेत वृंदावनचे प्रेमानंद महाराज.
प्रेमानंद महाराज गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आरोग्य समस्येने त्रस्त आहेत. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांनी (Kidneys) काम करणे बंद केले आहे, ज्यामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस (Dialysis) उपचार घ्यावे लागतात. महाराजांची ही स्थिती पाहून, अनेक भक्तांनी त्यांना किडनी दान (Kidney Donation) करण्याची तयारी दर्शवली.
मात्र, प्रेमानंद महाराजांनी भक्तांचे हे प्रेमळ दान विनम्रपणे नाकारले आहे. या नकारामागे त्यांचे आध्यात्मिक आणि भक्तीमार्गातील मोठे तत्त्वज्ञान दडले आहे, जे त्यांनी आपल्या शिष्यांना स्पष्ट केले आहे.
महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितले की, त्यांनी दान केलेली किडनी न स्वीकारण्यामागे दोन मुख्य आध्यात्मिक कारणे आहेत:
१. आता शरीर त्यागण्याची वेळ:
महाराजांनी स्पष्ट केले की, ते आता हे शरीर त्यागू इच्छितात. ते म्हणतात, "मी आता या शरीराला मुक्ती देऊ इच्छितो. दुसऱ्या व्यक्तीने दान केलेला अवयव घेऊन मी जगायला तयार नाही." त्यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्याच्या देहाचा अंत निश्चित आहे. राधा राणीची इच्छा असेपर्यंत त्यांचे श्वास सुरू राहतील, पण दुसऱ्याच्या शरीराला कष्ट देऊन त्यांना आयुष्य वाढवायचे नाही.
२. अध्यात्मात कर्माचे महत्त्व: प्रेमानंद महाराजांसाठी, त्यांच्या वेदना आणि शारीरिक कष्ट हे ईश्वराच्या इच्छेचा आणि कर्मफळाचा एक भाग आहेत. एका भक्ताला त्रास देऊन त्याचा अवयव घेणे, हे निष्काम कर्मयोगाच्या तत्त्वाविरुद्ध आहे, असे त्यांचे मत आहे.
"एका किडनीला आम्ही कृष्ण मानले आहे आणि दुसऱ्याला राधा. त्यांना आम्ही स्वतःपासून कसे वेगळे करू शकतो?" या वाक्यातून त्यांनी आपल्या भक्तीभावाची तीव्रता आणि शारीरिक स्थितीचा स्वीकार करण्याची वृत्ती स्पष्ट केली.
प्रेमानंद महाराजांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना शरीराच्या दुःखाऐवजी भक्ती आणि सेवेवर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला. भगवान श्रीकृष्ण आणि राधा रानीचा नित्य भजन आणि नामस्मरण करावे असे ते नेहमी म्हणतात. इतरांच्या सेवेमध्ये आपले जीवन समर्पित करावे. कर्मफळ स्वीकारून अध्यात्मिक मार्गावर पुढे जावे असा संदेश ते देतात.
महाराजांच्या या निर्णयामुळे अनेक भाविक निराश झाले, पण यातूनच त्यांची अटल श्रद्धा आणि वैराग्य वृत्ती सिद्ध होते, ज्यामुळे ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत.