Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:49 IST2025-09-02T11:48:46+5:302025-09-02T11:49:19+5:30
Parivartani Ekadashi 2025 Vrat Benefits: बदल हा सृष्टीचा नियम आहे, पण तो आयुष्यात घडावा वाटत असेल तर प्रयत्नाला उपासनेची जोड हवी; त्यासाठी ३ सप्टेंबरला करा परिवर्तनी एकादशी व्रत!

Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
Parivartani Ekadashi 2025: प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्व सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्ये ही निसर्गाशी निगडित आहेत. 3 सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशी (Parivartani Ekadashi 2025) आहे. ही एकादशी पद्मा एकादशी या नावेही ओळखली जाते. या एकादशीमागे काय कथा आहे ती जाणून घेऊ. तिचे व्रतमहात्म्य आणि व्रतविधीदेखील समजून घेऊ.
मांधाता राजालाही झाला होता या एकादशीचा लाभ :
फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले. त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला. त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले. परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले. राजा आणि प्रजा सुखी झाली. आपणही हे व्रत आपल्या उन्नतीसाठी, तसेच समाजात परिवर्तन घडावे यासाठी करावे. जेणेकरून माऊलींनी पसायदानात उल्लेख केल्याप्रमाणे 'जो जे वांछिल तो ते लाहो' अर्थात ज्याला जे हवे ते मिळून सगळे सुखी, आनंदी होतील. असे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे.
Gauri Visarjan 2025: जाणून घ्या गौरी विसर्जनाचा मुहूर्त आणि टाळा 'या' महत्त्वाच्या चुका!
कसे करावे हे व्रत?
हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवान श्रीविष्णूंची यथासांग पूजा करावी. पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे. द्वादशीला सकाळी सात्विक भोजन करून उपास सोडावा. विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात, ते ही एकादशीदेखील करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच साधा सात्त्विक आहार घ्यावा. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करावे. सातत्याने देवाचे स्मरण केल्यामुळे चित्तशुद्धी होते, मन प्रसन्न राहते आणि कामासाठी नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपसुख परिवर्तन घडते, आपल्या आयुष्यातही आणि आपल्यामुळे दुसर्यांच्या आयुष्यातही!
इच्छित मनोकामनापूर्तीसाठी केले जाते हे व्रत :
या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असेही म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते.