Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:37 IST2025-11-20T10:27:20+5:302025-11-20T10:37:14+5:30
Palmistry: तळहातावरील शनि पर्वताजवळ असलेल्या रेषा व्यक्तीला केवळ धनवान नाही, तर लोकप्रिय, प्रचंड यश-प्रगती देणाऱ्या ठरू शकतात, असे म्हटले जाते.

Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
Palmistry: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची केवळ कुंडली नाही, तर भाग्यांक, मूलांक, हस्तरेषा, हस्ताक्षर, चेहरा अशा अनेक गोष्टींवरून भविष्यकथन करता येऊ शकते. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून व्यक्तीविषयी अंदाज बांधले जाऊ शकतात. अंकशास्त्र, समुद्रशास्त्र, होराशास्त्र यासह ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची शाखा म्हणजे हस्तरेषशास्त्र. तळहातावरील उभ्या, आडव्या रेषा, पर्वत, उंचवटे यांचा अभ्यास केला जातो आणि यावरून भविष्यकथन किंवा काही अंदाज बांधले जातात. यातील काही रेषा या अचानक श्रीमंतीचे संकेत देतात. या रेषा नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनिशी निगडीत असल्याचे म्हटले जाते.
तळहातावरील काही रेषांना ठराविक नावे देण्यात आलेली असतात. तळहातावर अनेक रेषा आहेत, ज्यात मुख्य म्हणजे धनरेषा, जीवनरेषा, हृदयरेषा वगैरे. या रेषा तळहातावरून पाच बोटांपैकी कोणत्या बोटाला कुठे जाऊन मिळतात, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही रेषा सरळ आणि ठळक असतात. तर काही रेषा पुसट किंवा खंडीत असतात. यावरून जीवन, साधन- संपत्ती, करिअर, कुटुंब यांबाबत तर्क लावले जाऊ शकतात.
शनिचे तळहातावरील स्थान आणि राजयोगाची चिन्हे
हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे मधले बोट व त्याखालील उंचवटा यावर शनि स्थान मानलेले आहे. शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनीची ख्याती सांगितली जाते. ज्योतिषशास्त्रात पंच महापुरुष राजयोगाचे वर्णन येते. त्याचप्रमाणे हस्तरेषेवरील रेषांचे विश्लेषण करून राजयोगाबाबत कथन केले जाऊ शकते. शनिशी निगडीत शश नामक राजयोगाबाबत जाणून घेणार आहोत. हा योग शनि रेषेमुळे तयार होतो. असे लोक गरीब कुटुंबात जन्माला आले तरी श्रीमंत होतात, असे मानले जाते. तसेच समाजात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते. असे लोक दूरदर्शी असतात.
तळहातावरील शनि पर्वत आणि जवळील रेषा
हस्तरेषाशास्त्रानुसार, शनि पर्वत पूर्णपणे स्वच्छ आणि सुव्यवस्थित असेल तर ते भाग्यवान मानले जातात. या व्यक्ती नशिबापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. कठोर परिश्रम करूनच ते आपले ध्येय साध्य करतात. ते प्रचंड संपत्ती कमावतात. ते त्यांच्या कामात कोणतीही चाल-ढकल किंवा आळस करत नाहीत. त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही. ते सामाजिकदृष्ट्या सक्रीय असतात. अनेकदा गरीबांना मदत करतात.
राजकारणात मोठे पद, लोकप्रिय आणि धनवान होतात
हस्तरेषाशास्त्रानुसार, शनि आणि बुध असे दोन्ही पर्वत पूर्ण ठळक आणि उठावदार असतील, तर अशा व्यक्ती आयुष्यात भरपूर पैसे कमवतात. ते प्रमुख व्यापारी बनतात. व्यवसायात जोखीम घेऊन ते खूप पैसे कमवतात. ते भविष्याचा अचूक वेध घेणारे असतात. अशा व्यक्ती राजकारणात उच्च पदांवर पोहोचतात, प्रचंड संपत्ती कमावतात. धनवान होतात. मोठी लोकप्रियता मिळवतात. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
खूप प्रतिष्ठा मिळते, दान-धर्म खूप करतात
तळहातातील शनि पर्वत गुरु पर्वताकडे झुकला असेल तर तो शुभ मानला जातो. अशा लोकांना खूप प्रतिष्ठा मिळते आणि समाजात त्यांचा खूप आदर केला जातो. ते त्यांच्या दानधर्मासाठी आणि त्यांच्या धार्मिक कार्यांसाठी ओळखले जातात. ते वारंवार धार्मिक तीर्थयात्रा करतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.