ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:34 IST2025-01-29T11:33:04+5:302025-01-29T11:34:07+5:30

थंडी काढता पाय घेऊ लागली आहे, त्यामुळे अंथरूण सोडून आपणही आता ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावून घेऊ आणि त्याचे लाभ घेऊ. 

Once you know the nine benefits of waking up at Brahma Muhurta, you won't want to sleep late! | ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे जर की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती साध्य होते. कशी ते पाहू. 

हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात. याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.

१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.

४) चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते. या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात.
ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे : दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार. या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.  हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.

६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच याकाळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.

७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात. त्यासाठी ब्राह्ममुहुर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.

८) या काळात आपण ॐ मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात.  या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

Web Title: Once you know the nine benefits of waking up at Brahma Muhurta, you won't want to sleep late!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.