२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:40 IST2025-11-20T10:33:17+5:302025-11-20T10:40:32+5:30
शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे, हा महिना अध्यात्मिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मानला जातो; कसा ते पाहू!

२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
मराठी दिनदर्शिका पाहिली तर लक्षात येईल असा एकही महिना नाही, ज्यात सण, उत्सव, व्रत वैकल्य नाहीत. मनुष्य हा उत्सव प्रेमी आहे, हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वसुरींनी संसार आणि परमार्थाची गुंफण करत अतिशय सुंदर आखणी केली आहे. म्हणूनच या ना त्या औचित्याने केलेली पूजा, उत्सव आपल्याला नवी ऊर्जा देते, जगण्याचे बळ मिळते, दुःखावर फुंकर पडून सुखाची वाट मोकळी होते. असाच मार्गशीर्ष महिना(Margashirsha Maas 2025) २१ नोव्हेंबर रोजी सुरु होत आहे. केवळ संसारात गुंतून न राहता देवधर्म, अध्यात्म याचीही गोडी लावणारा हा महिना जवळपास ९० प्रकारच्या व्रतांनी खचून भरलेला आहे. कसा ते पाहू.
मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. त्यामुळे या महिन्यात ईशसेवा आणि पुण्य संचय या हेतूने तब्ब्ल ९० व्रते केली जातात. पैकी अनेक व्रते कालौघात मागे पडली, परंतु आजही उर्वरित अनेक व्रतांचे भाविक यथाशक्ती पालन करतात.
पुणे येथील संजीव वेलणकर लिहितात, 'मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना. संस्कृतमध्ये मार्गशीर्षाला 'केशव मास' म्हटले गेले, कारण लक्ष्मीसमवेत पितांबरधारी विष्णूही हेमंताचे स्वागत करतात. अलीकडे मराठी महिलांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या लक्ष्मीव्रतात(Mahalaxmi Vrat 2025) जे लक्ष्मीस्तोत्र वाचले जाते, त्यात मार्गशीर्षाचे उत्तम वर्णन आहे. ' पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात वसे लक्ष्मी अंश, तोच योग्य लक्ष्मीव्रतास, प्रत्येक वर्षी सर्वदा...' असे हे लक्ष्मीस्तोत्र सांगते. हा महिना देव देवतांच्या आराधने साठी पवित्र आणि मह्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लक्ष्मी मातेची श्रद्धेने उपासना करतात. या महिन्याचे प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी पुजा व उपासना करतात. आणि शेवटच्या गुरुवारी सात कुमारीका आणि/किंवा सात सवाष्णीची पुजा करतात. लक्ष्मी मातेच्या पोथीत सांगितल्याप्रमाणे पुजा व्यवस्थित करावी. मनापासुन श्रद्धेने उपासना करावी. तेव्हा देवी प्रसन्न होईल, तुमची मनोकामना पुर्ण होईल. उपवासाचे दिवशी फराळामध्ये दुध फुले घेऊन देवी मातेचे नामस्मरण करावे. खरीपाचे पीक घरात आलेले असते, वाड्यांमध्ये भाजीपाला पिकलेला असतो, त्यामुळे रांजणात धान्य आणि तिजोरीत लक्ष्मी, अशी गावाकडची परिस्थिती असते.
जेजुरीच्या खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून एकूण सहा दिवसांचे जे पूजन होते त्यालाही 'खंडोबाचे नवरात्र(Khandobache Navratra 2025) असेच म्हटले जाते. पहिल्या दिवशी देव दिवाळी(Dev Diwali 2025) साजरी केली जाते. मणि-मल्ल या दोन दैत्यांनी लोकांचा अपार छळ केला. त्या वेळी भगवान शिवशंकर खंडोबाच्या रूपात योद्धा बनून आले. त्यांचे या दोन्ही दैत्यांबरोबर सहा दिवस घनघोर युद्ध झाले. त्यात दोन्ही दैत्य मारले गेले. तो दिवस चंपाषष्ठीचा होता. त्या युद्धातील शिवशंकरांच्या विजयाची आठवण म्हणून भक्तभाविक आजदेखील चंपाषष्ठीला(Champashashthi 2025) फार मोठा उत्सव करतात. ह्या दिवशी खंडोबाची जत्रा भरते. मुळात महराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून खंडोबाची एकूण बारा स्थाने असली, तरीही जेजुरीला भाविकांमध्ये आगळे स्थान आहे.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला शिव-गौरी यांची तांदळाच्या पिठापासून मूर्ती तयार करून त्याची पूजा करतात. अन्यथा नाम:स्मरण करून मानसपूजा देखील करतात. सुखी संसार, धन, धान्य, संपत्ती, भरभराट यासाठी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला ही मानसपूजा बांधली जाते. द्वितीयेला पितृपूजन केले जाते. म्हणजेच सर्व पितरांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तृतीयेला फलत्याग नावाचे व्रत आहे. या व्रतात, वर्षभरासाठी फळांचा त्याग केला जातो. वास्तविक फलत्याग यामागे निरिच्छ मनाने ईशसेवा हा उद्देश अभिप्रेत असावा, परंतु फळांचा त्याग, अशी प्रथा पडली. या तृतीयेपासून दर महिन्याच्या तृतीयेला गौरीच्या विविध नामांची उजळणी करून वर्षभर व्रत केले जाते. हे व्रत देखील सुखी संसााराच्या प्राप्तीसाठी असते. चतुर्थीला बाप्पाचा मान असतो. केशव मास असूनही बाप्पाचे स्थान अढळ असल्याने चतुर्थी ही तिथी बाप्पाच्या पूजेसाठी राखीव ठेवलेली आहे.
पंचमीला नागदिवाळी(Nag Diwali 2025) हा पारंपरिक कुलाचार, सोहळा केला जातो. या दिवशी श्रावणातील नागपंचमीप्रमाणे मार्गशीर्षातील पंचमीला नागाची पूजा केली जाते. घरातील पुरुषांच्या नावे पक्वान्न करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ते पक्क्वान्न गोरगरीबाला दान दिले जाते. तसेच या तिथीला `श्रीपंचमी' देखील म्हणतात. श्रीपंचमीला लक्ष्मीची पूजा केली जाते. या तिथीला कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला, म्हणून ही तिथी `महातिथी' म्हणूनही ओळखली जाते.
मार्गशीर्ष षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. त्यादिवशी ब्रह्मदेवांसाठी कमळ पुष्पाचे दान दिले जाते. या दिवशी प्रावरणषष्ठी व्रत असते. त्यानुसार वस्र दान केले जाते. वस्र दान कोणाला? तर थंडीच्या दिवसात वस्राअभावी, उबदार कपड्यांअभावी हुडहुडणाऱ्या लोकांना शाल, पांघरुण, लोकरीचे कपडे दान देता येतात. तसेच देवालाही लोकरीचे कपडे घातले जातात.
सप्तमी सूर्याशी संबंधित आहे. सूर्यपूजा केली जाते. अष्टमीला दत्तक्षेत्री(Datta Jayanti 2025) दत्तात्रेयांच्या नवरात्रींच्या व्रतोत्सवाला प्रारंभ होतो. त्याची समाप्ती पौर्णिमेला होते. नवमीला चंडिकेची पूजा करतात. तिला नंदिनीनवमी असे म्हणतात. दशमीला रविवार असल्यास दशादित्यव्रत केले जाते. इंद्र, कुबेर यांच्यासह दहा दिशांच्या देवतांची पूजा केली जाते.
दहा दिवसात एवढी व्रते, तर उर्वरित मासात आणखी किती? हे समीकरण आगामी लेखांमधून सुटेलच. तुर्तास एवढेच.