Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:22 IST2025-10-18T16:10:11+5:302025-10-18T16:22:41+5:30
Narak Chaturdashi 2025 Abhyanga Snan: यंदा सोमवारी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे, दिवाळीची पहिली अंघोळ आणि कारीट फोडण्याचा विधी या दिवशी का करतात ते पाहू.

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीची(Diwali 2025) दणक्यात सुरुवात झाली आहे. पावसाने वेळेतच माघार घेतल्याने लोकांच्या उत्साहावर पाणी फिरले नाही. १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने दीपोत्सव सुरु झाला असून, १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन(Laxmi Pujan 2025), २२ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, २३ ऑक्टोबरला भाऊबीज(Bhai Dooj 2025) असा भरगच्च आठवडा असणार आहे.
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
अशातच नरक चतुर्दशीच्या सणाला पहिल्या अंघोळीचा मान मिळाला आहे. या दिवशी अभ्यंग स्नान व कारीट फोडणे या दोन प्रमुख पारंपरिक गोष्टी भल्या पहाटे केल्या जातात. त्यामागे नेमके कारण काय? ते जाणून घेऊ.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi 2025). या दिवसाला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे एक प्रमुख पौराणिक कथा आहे आणि याच कथेमुळे या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडणे या दोन खास परंपरा पाळल्या जातात.
नरक चतुर्दशीची पौराणिक कथा:
प्राचीन काळात नरकासुर नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देवांना, ऋषींना, सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला. त्याने १६,००० राजकन्यांना बंदी बनवून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली.
भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले. याच दिवशी, म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराच्या वधानंतर, लोकांनी अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला, जो पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला.
अभ्यंग स्नानाचे महत्त्व (पापांचा नाश) :
नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते. हे डाग धुऊन शरीर शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला सुंगधी तेल, उटणे लावून जे स्नान घातले, त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली. हे स्नान पहाटे सूर्योदयापूर्वीच करायचे असते. मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जाते. या दिवशी स्नान केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते.
कसे करावे यमतर्पण?
तांब्याच्या कलशात पाणी, काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत पुढील मंत्र म्हणा.
ॐ यमाय नमः। ॐ धर्मराजाय नमः। ॐ मृत्यवे नमः। ॐ अन्ताकाय नमः। ॐ वैवस्वताय नमः। ॐ कालाय नमः। ॐ सर्वभूतक्षयाय नमः। ॐ औदुम्बराय नमः। ॐ दध्राय नमः। ॐ नीलाय नमः। ॐ परमेष्ठिने नमः। ॐ वृकोदराय नमः। ॐ चित्राय नमः। ॐ चित्रगुप्ताय नमः।
अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता, ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे.
कारीट फोडण्याची प्रथा
अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचे एक फळ (जे कडवट असते) ते पायाने फोडण्याची प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण, कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, याचे प्रतीक म्हणून नरक चतुदर्शीला पहाटे पाय ठेवून कारीट फोडले जाते. कारीट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो. हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते. कारीट फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते. यानंतर सुगंधी अभ्यंगस्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते.
थोडक्यात, नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही, तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते. या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडण्याची प्रथा पाळून, प्रत्येकजण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास बळ देते.