Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:04 IST2025-07-29T14:03:01+5:302025-07-29T14:04:09+5:30
Nag Panchami 2025: नागपंचमीला पुढील तीन नागांचे स्मरण करा आणि सर्पदोषातून मुक्ती मिळवा, असे पुराणात म्हटले आहे, काय आहे वैशिष्ट्य? ते पाहू.

Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शिव पार्वती आणि सर्प देवतांची पूजा केली जाते. या प्रसंगी वासुकी, शेषनाग आणि तक्षक यांसारख्या सापांचे स्मरण केले जाते. पण याच सापांना एवढे महत्त्व का? ते नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊ.
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
वासुकी नाग
देवाधिदेव महादेवाच्या गळ्यात हार म्हणून विराजमान होण्याचा मान मिळाला तो वासुकीला! त्याला सापांचा राजा असेही म्हटले जाते. या प्रजातीच्या सापांना महर्षी कश्यप आणि कद्रू यांची वंशज मानले जाते. त्यांच्या पत्नीचे नाव शतशिपा होते. समुद्रमंथनाच्या वेळी नागराज वासुकीचा दोरी म्हणून वापर करण्यात आला होता असेही म्हटले जाते. देव दानवांच्या युद्धात त्याने समुद्र मंथनाच्या वेळी सहन केलेले आघात पाहता महादेवांनी त्याला आपलेसे केले आणि आपल्या हृदयाजवळ धारण केले.
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
शेषनाग
शेषनागच्या आईचे नाव कद्रू होते. त्याच्या आईने आणि भावांनी मिळून कश्यप ऋषींची दुसरी पत्नी विनिता हिला फसवले होते. हे पाहून तो आपल्या आईला आणि भावांना सोडून गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करायला गेला. यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले की त्याची बुद्धी कधीही धर्मापासून विचलित होणार नाही. म्हणून त्याला विष्णूंच्या पायाशी स्थान मिळाले.
ब्रह्मदेवाने शेषनागाला पृथ्वीला आपल्या मस्तकावर धरून ठेवण्यास सांगितले. म्हणूनही त्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते. शेषनाग भगवान श्रीरामांचे धाकटे भाऊ लक्ष्मण आणि श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम यांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता.
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
तक्षक नाग
पाताळ लोकात राहणारा तक्षक हा महाभारत काळातील साप असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की शृंगी ऋषींच्या शापामुळे तक्षकाने राजा परीक्षितला दंश केला होता. याचा बदला घेण्यासाठी परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने नाग राजवंशाचा नाश करण्यासाठी सर्पबळी दिला. परंतु, आस्तिक ऋषींच्या सल्ल्यानुसार, जनमेजयने सर्पबळी थांबवला आणि तक्षकाचा जीव वाचवला. तो दिवस श्रावणाचा पाचवा दिवस होता. असे म्हटले जाते की तेव्हा सापांनी आस्तिक मुनींना वचन दिले होते की जो कोणी नागपंचमीला सापांची पूजा करेल त्याला सर्पदंशाची भीती वाटणार नाही.
(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)