>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह झाल्यानंतर जेव्हा खरा संसार सुरू होतो, तेव्हा एकमेकांची ओळख खऱ्या अर्थाने होते. लग्नाआधी "मी हे करीन, ते करीन" अशा आणाभाका घेतलेला तो आणि ती, प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यावर नक्की कसे वागतात, हे पाहणे महत्त्वाचे असते.
Ritual: मीठ-मोहरीच नाही, तर 'या' वस्तूंनीही काढतात व्यक्ती आणि वास्तूची दृष्ट; जाणून घ्या लाभ!
संसार ही शेवटी एक तडजोड आहे हे खरे असले, तरी कित्येक स्त्री-पुरुषांना स्वतःच थाटलेल्या संसारात रस नसतो. संसार, घर आणि कुटुंब हे दोघांचे असते. त्यासाठी लागणारे केवळ अर्थार्जनच नाही, तर संसारातील मुलांच्या जबाबदाऱ्या, पाहुणे-रावळे, नातेवाईक, सणवार, आणि कुटुंबातील कार्यात असणारा सहभाग महत्त्वाचा ठरतो. अगदी रोजच्या जीवनातील कामांची विभागणी—जसे की मुलांना तयार करण्यास मदत करणे, त्यांना शाळेत सोडणे, घरी मदतीला कोणी आले नाही तर घराच्या स्त्रीला कामात मदत करणे—हे जर न सांगता मनापासून केले, तर त्या संसारात खऱ्या अर्थाने गोडवा राहतो.
संसारातील सगळ्या चढ-उतारांवर एकमेकांचा हात सोडायचा नाही, हेच अपेक्षित असते. "ही कामे स्त्रीची आणि ही पुरुषांची" असे बोलण्याचे दिवस आता गेले. घर सगळ्यांचे, तर सगळी कामेही सगळ्यांचीच असायला हवीत.
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता, 'चंद्र' हा ग्रह संसार करणारा आहे. याचे कारण म्हणजे आपण चंद्राला प्रेमाचे आणि मनाचे प्रतीक मानतो. चंद्र जनमानसाला प्रिय आहे. शांत आणि सुस्वभावी माणसे संसारात स्वतःला झोकून देतात, एकमेकांसाठी जगतात आणि सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्ये निभावतात; तेव्हा त्यांचा चंद्र सुस्थितीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याउलट, पत्रिकेतील चंद्र जेव्हा दूषित असतो, तेव्हा संसारात मन लागत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या न पेलल्यामुळे घरात वारंवार वादाला तोंड फुटते. यामध्ये दोष स्त्रीचा किंवा पुरुषाचा, कोणाचाही असू शकतो. प्रेम दिल्यावरच मिळते, तसेच मानसन्मान मिळावा असे आपले वागणेही असायला हवे. चंद्र बिघडलेला असेल तर व्यक्तीला स्वतःच्याच मनाचा पत्ता नसतो; निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि ठामपणा यांचा अभाव असतो. अशा व्यक्तींना सतत कोणाच्या तरी आधाराची गरज भासते आणि जबाबदारी घेण्याची त्यांची मानसिक कुवत नसते.
सामुद्रिक शास्त्र: तुमच्या दातांमध्ये फट आहे का? अभिनंदन! तुम्ही आहात 'या' बाबतीत प्रचंड नशीबवान!
संसाराची आसक्ती आणि ओढ याचे द्योतक असणारा चंद्र हा ग्रह विवाह जुळवताना नीट तपासून पाहिला पाहिजे. माझ्या ओळखीतील दोन पत्रिकांचे उदाहरण दिले तर हे अधिक स्पष्ट होईल. एकाच्या पत्रिकेत चंद्र उच्चीचा आणि मीन नवमांशात पंचम भावात आहे, त्यामुळे त्याचे संसारात पूर्ण लक्ष असून संसार सुखाचा आहे. दुसऱ्याच्या पत्रिकेत चंद्र पंचम भावातच आहे, पण तो वृश्चिक राशीत (नीच राशीत) आहे; आता तुमच्या लक्षात आलेच असेल की तिथे परिस्थिती वेगळी का आहे.
कुठलीही गोष्ट मनापासून केली तरच त्यात आनंद आणि प्रेम मिळते, अन्यथा सर्व फोल आहे. चंद्र म्हणजे स्वभावातील 'मूड्स', जे संसारात सांभाळावे लागतात. तुमचे मूड्स सांभाळायला लोकांनी माणसे ठेवलेली नाहीत. सतत आपल्याच मनासारखे कसे होईल? जेव्हा आपण इतरांच्या मनासारख्या चार गोष्टी करू, तेव्हाच आपल्याही मनाचा विचार कोणीतरी करेल. कुटुंबाशिवाय आपल्या आयुष्यात कार्यालयीन व्यक्ती, नातेवाईक आणि मित्र असतात; त्यांच्याशी नाळ जोडली जाते ती केवळ चंद्रा मुळेच. चंद्र चांगला नसेल तर एकटेपणा येतो, मित्र नसतात आणि समाजात कोणाशीही संबंध नसलेले कोरडे जीवन वाट्याला येते. घरात एकमेकांशी प्रेमाचे बंध नसतील तर संसार नीरस होईल, पटतंय ना?
Marriage Astro: विवाह योग पुरेसा नाही, ग्रहदशाही महत्त्वाची; अन्यथा विवाहात येतात 'या' अडचणी!
चंद्र शुद्ध असेल आणि त्याला नवमांश बळ असेल, तरच व्यक्ती कुटुंब, मित्र आणि समाजात सर्वार्थाने रमेल. त्यामुळे विवाह करताना केवळ सप्तम भाव, सप्तमेश आणि शुक्र न पाहता, प्रामुख्याने चंद्राचा सखोल अभ्यास करायलाच हवा, हे निदर्शनास आणून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
श्री स्वामी समर्थ