आज मराठी भाषा गौरव दिन! साक्षात सरस्वतीच्या लेण्याने नटलेल्या आपल्या मायमराठीचा अभिमान बाळगण्याचा दिवस. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा साजरा करण्यात येतो. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती रसाळ आहे, ती धारदार आहे आणि तितकीच ती नादमयी सुद्धा आहे. आपल्या भाषेचे हेच अष्टपैलू सौंदर्य अनुभवायचे असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या 'नृसिंह पंचक' स्तोत्रासारखे दुसरे उत्तम उदाहरण नाही.
लाटानुप्रासाचा चमत्कार आणि जिभेचे वळण
मराठी साहित्यात 'अनुप्रास' हा अलंकार आपण अभ्यासतो, पण 'नृसिंह पंचक' हे 'लाटानुप्रासाचे' एक सर्वोच्च शिखर आहे. यात शब्दांची अशी काही गुंफण आहे की, ते म्हणताना अक्षरशः बोबडी वळते! पण हाच तर खरा व्यायाम आहे. आपल्या मराठी भाषेतील अक्षरांना जिभेवर कसे खेळवायचे, याचे वळण हे स्तोत्र लावून देते. हे केवळ स्तोत्र नसून, आपल्या जिभेला आणि उच्चारांना स्पष्टता देणारे एक उत्तम 'स्पीच थेरपी'चे साधनही ठरू शकते.
तेजस्वी आणि ओजस्वी रूप
समर्थांची ही रचना वाचताना केवळ शब्द ऐकू येत नाहीत, तर डोळ्यासमोर साक्षात भगवान नृसिंहाचे रौद्र आणि तेजस्वी रूप उभे राहते. स्तंभातून प्रगट होणारा तो प्रलयंकारी आवेश, ती अग्नीची ज्वाळा आणि दैत्याचा संहार करणारी ती शक्ती... हे सर्व समर्थांनी शब्दांच्या 'नादातून' उभे केले आहे.
या स्तोत्राचे शब्द उच्चारताना अंगावर शहारे येतात. ही ताकद आपल्या मराठी शब्दांत आहे. 'कडकडाट', 'घडघडाट', 'तडतडाट' अशा शब्दांच्या पुनरावृत्तीमुळे सृष्टीचा थरकाप उडवणारा तो क्षण जिवंत होतो.
आजच्या दिवसाचे 'आह्वान'!
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण अनेक कार्यक्रम करतो, पण आज आपल्या भाषेचे हे 'रांगडे' आणि 'नादमयी' रूप अनुभवण्याचे आव्हान स्वीकारणार का? खाली दिलेल्या ओळी किमान एकदा तरी स्पष्ट उच्चारात म्हणून पहा. सुरुवातीला कदाचित जिभेची अडखळण होईल, पण सरावाने जेव्हा हे शब्द लयीत बाहेर पडतील, तेव्हा तुम्हाला स्वभाषेच्या सामर्थ्याचा एक वेगळाच अभिमान वाटेल.
नृसिंह पंचक स्तोत्र
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।
झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी। कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं। घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं। तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं। धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
भरभरित भरारी भर्भराटे भरारी। थरथरित थरारी थर्रथराटे थरारी। तरतरित तरारी तर्तराटे तरारी। चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।
रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।
- श्रीसमर्थ रामदासस्वामी
मराठी भाषा ही केवळ 'मऊ मेणाहुनी' नाही, तर ती 'वज्रासमान' कठीण शब्दही पेलणारी आहे. समर्थांच्या या रचनेतून भाषेचे हेच वैभव प्रगट होते. चला तर मग, या गौरव दिनी आपल्या जिभेला मराठीच्या या ओजस्वी वळणाने न्हाऊ घालूया! हे काव्य ऐकण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वरील रील पाहा -
Web Summary : Marathi Language Day celebrates the richness of Marathi. The article highlights the 'Nrusinha Panchak' stotra by Samarth Ramdas Swami as an example of the language's complexity and beauty, challenging readers to recite it.
Web Summary : मराठी भाषा दिवस मराठी की समृद्धि का जश्न मनाता है। लेख में समर्थ रामदास स्वामी द्वारा रचित 'नृसिंह पंचक' स्तोत्र को भाषा की जटिलता और सुंदरता के उदाहरण के रूप में उजागर किया गया है, पाठकों को इसे पढ़ने की चुनौती दी गई है।